भारतीय संघाने आपल्या सांघिक खेळासहित निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करताना तिसऱ्या सुल्तान जोहोर चषक हॉकी स्पर्धेच्या (२१ वर्षांखालील) विजेतेपदाला गवसणी घातली. भारताने अंतिम सामन्यात यजमान मलेशियाला ३-० असे सहज पराभूत केले.
एकतर्फी झालेल्या अंतिम लढतीत अमोन मिराश तिर्की याने २२व्या मिनिटाला भारताचे खाते उघडले. पूर्वार्धात याच गोलच्या आधारे त्यांनी आघाडी राखली होती. उत्तरार्धात सामन्याच्या ५२व्या मिनिटाला अफान युसूफ याने भारताला २-० अशी आघाडी मिळवून दिली. मनप्रित सिंग याने ६४व्या मिनिटाला संघाचा तिसरा गोल केला. गतवर्षी भारताला या स्पर्धेच्या अंतिम फेरीत जर्मनीकडून पराभव स्वीकारावा लागला होता.
मलेशियाविरुद्धच्या लढतीत भारताने सुरुवातीपासून खेळावर नियंत्रण मिळविले होते. पाचव्या मिनिटाला भारताला गोल करण्याची संधी मिळाली होती, मात्र सतबीर सिंगने मारलेला फटका मलेशियाचा गोलरक्षक महम्मद हफीझउद्दीनने शिताफीने अडविला. १३व्या मिनिटाला भारताला पॅनल्टी कॉर्नर मिळाला, मात्र अमित रोहिदासला त्याचा फायदा घेता आला नाही. पुढच्या मिनिटाला मलेशियाच्या महम्मद युसूफला गोल करण्याची संधी लाभली होती, मात्र भारताचा गोलरक्षक हरजोत सिंगने ही चाल रोखण्यात यश मिळविले. २२व्या मिनिटाला भारताच्या कोठाजित सिंगने जोरदार चाल करीत तिर्कीकडे पास दिला. तिर्की याने कोणतीही चूक न करता गोल केला. त्यानंतर भारतास तीन पॅनल्टी कॉर्नर मिळाले मात्र भारताने ही संधी वाया घालविली.
उत्तरार्धाच्या सुरुवातीला भारताने आणखी दोन पॅनल्टी कॉर्नर वाया घालविले. ४७व्या मिनिटाला मलेशियाने बरोबरी करण्याची संधी दवडली. त्यांच्या इझाद हाकिमी याने मारलेला फटका भारताचा गोलरक्षक हरजोताने अडविला. ५२व्या मिनिटाला भारताच्या रमणदीप सिंग याने वेगवान चाल करीत अफान युसूफकडे चेंडू तटविला. त्याने अचूक फटका मारून भारताचा दुसरा गोल केला. ६४व्या मिनिटाला भारताला आठवा पॅनल्टी कॉर्नर मिळाला. त्याचा फायदा घेत मनप्रितने सुरेख गोल केला.
विजेत्यांना हॉकी इंडियाकडून रोख इनाम
सुलतान जोहर चषक विजेत्या २१ वर्षांखालील भारतीय संघाला हॉकी इंडियाने प्रत्येकी एक लाख रुपयांचे बक्षिस जाहीर केले, तर सहयोगी कर्मचाऱ्यांना प्रत्येकी ५० हजार दिले जाणार आहेत. स्पर्धेतील गुणवान खेळाडूचा मानकरी ठरलेल्या हरजीत सिंगला एक लाख रुपयांच्या अतिरिक्त पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. महिला आशिया चषकात सर्वोत्तम गोलरक्षक पुरस्कार मिळवणाऱ्या सविताला एक लाख रुपये दिले जाणार आहे.