Hong Kong Open Badminton – या स्पर्धेत पुरुष एकेरीच्या गटात स्विस आणि हैदराबाद खुल्या बॅडमिंटन स्पर्धांचे विजेतेपद पटकावणाऱ्या समीर वर्मा याला सामना न खेळताच पुढील फेरीचे तिकीट मिळाले. समीरचा दुसऱ्या फेरीतील सामना चीनच्या चेन लॉंग याच्याशी होता. पण लॉंगने दुखापतीच्या कारणामुळे स्पर्धेतून माघार घेतली. त्यामुळे समीरला सामना खेळावा लागला नाही. आधीच्या फेरीत त्याने थायलंडच्या सुपान्यू अविहींग्सनॉन याचा पराभव केला होता. त्याने सरळ गेममध्ये हा सामना खिशात घातला होता. पहिला गेम २१-१७ने जिंकल्यावर दुसऱ्या गेममध्ये प्रतिस्पर्धी खेळाडूंकडून झुंज पाहायला मिळेल, अशी अपेक्षा होती. पण ती अपेक्षा फोल ठरली होती आणि दुसरा गेम २१-१४ ने जिंकत समीरने पुढील फेरीत प्रवेश केला होता.

दुसरीकडे, मिश्र दुहेरीच्या गटात भारताच्या सात्विकसाईराज रेकिरेड्डी-अश्विनी पोनप्पा या जोडीला पराभवाचा सामना लागला. तैवानच्या ली यांग आणि सू या चिंग या जोडीशी झालेल्या सामन्यात भारतीय जोडीला १७-२१, ११-२१ असा पराभव स्वीकारावा लागला. पहिला गेम १७-२१ ने गमावल्यानंतर दुसऱ्या गेममध्ये भारतीय जोडीने फारसा संघर्ष केला नाही. त्यामुळे २१-११ अशा मोठ्या फरकाने तैवानच्या ली यांग आणि सू या चिंग या जोडीला विजय मिळवता आला. भारतीय जोडीने आधीच्या फेरीत चिनी तैपेईच्या जोडीला धूळ चारली होती. त्यांनी वांग ची-लीन आणि ली चिआ सिन या जोडीला २१-१६, १९-२१, २१-१४ असे पराभूत केले होते.