भारताचा माजी क्रिकेटपटू व्ही.व्ही.एस लक्ष्मणचा विषय निघाला की, त्याची ऑस्ट्रेलिया विरुद्धची इडन गार्डन्सवरील २८१ धावांची खेळी आवर्जून आठवते. २००१ साली ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या या कसोटी सामन्यात लक्ष्मणने ज्या चिवट फलंदाजीचे प्रदर्शन घडवले ते प्रेक्षक आजही विसरु शकलेले नाहीत. पण त्या खेळीबद्दल लक्ष्मणने आता एक महत्वाचा खुलासा केला आहे.

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या त्या कसोटी सामन्यासाठी मी पूर्णपणे फीट नव्हतो असे लक्ष्मणने गुरुवारी मुंबईत ‘२८१ अँड बियाँड’ या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात सांगितले. इडन गार्डन्सवरील ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी सामन्यात भारतीय संघ ज्या स्थितीत होता ते पाहता २८१ धावा माझ्या दृष्टीने महत्वपूर्ण कामगिरी आहे. त्या कसोटीमध्ये खेळण्यासाठी मी पूर्णपणे तंदुरुस्त नव्हतो. मी फिजिओ रुममध्ये गेलो त्यावेळी हेमांग बदानी तिथे होता. भारतीय संघाचे त्यावेळचे फिजिओ अँड्रयू लीपस यांच्यामुळे मी तो कसोटी सामना खेळू शकलो अशी आठवण लक्ष्मणने सांगितली.

या सामन्यात लक्ष्मण आणि राहुल द्रविडमध्ये महत्वपूर्ण भागीदारी झाली होती. द्रविड सातत्याने मला प्रोत्साहन देत होता असे लक्ष्मणने सांगितले. ऑस्ट्रेलियन संघाने त्यावेळी भारताला फॉलोऑन दिला होता. द्रविडने दुसऱ्या डावात १८० धावांची खेळी केली होती. भारताने तो कसोटी सामना १७१ धावांनी जिंकला नंतर मालिका २-१ अशी खिशात घातली.

सुरुवातीला मी हा कसोटी सामना खेळणार नव्हतो पण अँड्रयू लीपस यांच्यामुळे मी मैदानावर उतरु शकलो. मैदानावर जाऊन माझा नैसर्गिक खेळ खेळण्याची मला ही एक मोठी संधी होती. तो महत्वाचा कसोटी सामना होता. कारण मुंबईतील पहिल्या कसोटी सामन्यात मला धावा करता आल्या नव्हत्या. मी मैदानावर जाऊन माझा नैसर्गिक खेळ केला. भूतकाळात काय झालयं किंवा काय घडणार याचा अजिबात विचार केला नाही असे लक्ष्मणने सांगितले. माझ्या या कामगिरीचे श्रेय राहुल द्रविडला जाते. कारण दुसऱ्या टोकाकडून तो सतत मला प्रोत्साहन देत होता.