करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सध्या देशभरात भीती आणि तणावाचं वातावरण आहे. करोना बाधित झालेल्या रुग्णांवर डॉक्टर आणि वैद्यकीय अधिकारी लक्ष ठेवून आहेत. तर खबरदारीचा उपाय म्हणून लॉकडाऊनच्या काळात लोकांना घराबाहेर पडू न देण्यासाठी पोलिस यंत्रणा रात्रंदिवस सज्ज आहे. सध्याच्या घडीला बीसीसीआयने आयपीएलह सर्व महत्वाच्या स्पर्धा अनिश्चीत काळासाठी रद्द केल्या आहेत. मात्र फिरकीपटू हरभजन सिंहसाठी सध्या क्रिकेट महत्वाचं नाहीच आहे…सध्या देशात नागरिकांचं आरोग्य चांगलं रहावं ही गोष्ट गरजेची आहे. देशासमोर क्रिकेट ही छोटी गोष्ट असल्याचं हरभजन सिंहने ANI वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं.

“खरं सांगायचं झालं तर सध्याच्या घडीला माझ्या मनात क्रिकेटचा विचारच आलेला नाही. देशासमोर क्रिकेट ही छोटी गोष्ट आहे. आताच्या घडीला मी क्रिकेट किंवा आयपीएलचा विचार केला तर मी स्वार्थी ठरेन. सध्या देशातील लोकांचं आरोग्य चांगलं रहावं हे पहिलं उद्दीष्ट असलं पाहिजे. जर आपण सर्व सुखरुप आणि निरोगी राहिलो तरच कोणताही खेळ खेळू शकतो. क्रिकेटचा मी आता विचारही करत नाही”, हरभजन ANI शी बोलत होता. सध्याच्या घडीला राजधानी दिल्लीत आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. करोनाच्या भीतीमुळे रोजंदारीवरचे मजूर आपल्या गावाला जाण्यासाठी बस स्थानकांवर मोठ्या संख्येने गर्दी करुन उभे आहेत. हरभजनने याबाबत चिंता व्यक्त केली.

“माझ्या मते कोणत्याही प्रकारीच घोषणा करण्याआधी रोजंदारीवर काम करणाऱ्या इतर राज्यातील मजुरांचा विचार व्हायला हवा. त्यांच्याकडे रहायला घर, खायला अन्न, प्यायला पाणी यासारख्या मुलभूत सुविधा नसतात. सरकारने या लोकांची काळजी घेऊन त्यांना विश्वास देणं गरजेचं आहे. दिल्लीच्या बसस्थानकांवरचं चित्र पाहणं हे वेदनादायी आहे”, हरभजन सिंहने दिल्लीतील परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली. बीसीसीआयने १५ एप्रिलपर्यंत आयपीएल स्पर्धा पुढे ढकलली आहे. पण करोनामुळे सध्याची परिस्थिती पाहता आयपीएलच्या तेराव्या हंगामावरती टांगती तलवार अद्याप कायम आहे.