भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे आजीवन अध्यक्षपद कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही अशी ठाम भूमिका अभय चौताला यांनी घेतली आहे. ऑलिम्पिक संघटना ही एक स्वायत्त संस्था आहे. मग क्रीडा मंत्री विजय गोएल संघटनेला कारणे दाखवा नोटीस कशी पाठवू शकतात असा प्रश्नच त्यांनी उपस्थित केला आहे.

भारतीय ऑलिम्पिक संघटनेची (आयओए) सर्वसाधारण सभा मंगळवारी पार पडली होती. या सभेत सुरेश कलमाडी आणि अभय चौताला यांची संघटनेचे आजीवन मानद अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्याचा प्रस्ताव मंजुर झाला होता. या नियुक्तीवरुन वाद निर्माण झाला होता. सुरेश कलमाडी यांनी अध्यक्षपद स्वीकारण्यास नकार दिला आहे. पण दुसरीकडे अभय चौताला यांनी पद सोडणार नसल्याची ठाम भूमिका घेतली आहे. विजय गोएल म्हणतात भ्रष्टाचाराचे गंभीर गुन्हे असलेल्यांची आजीवन अध्यक्षपदी नियुक्ती होऊ शकत नाही. मी यासंदर्भात कायदेशीर सल्ला घेत आहे. लवकरच विजय गोएल यांना नोटीस पाठवणार असे चौताला यांनी सांगितले. भारतीय क्रीडा क्षेत्राची प्रतिमा मलिन करण्याचा डाव आहे. पण मी या कटकारस्थानाची पोलखोल करणार असून तोपर्यंत तर मी पद सोडणार नाहीच असे ते म्हणालेत.

कलमाडी आणि चौताला यांची आजीवन अध्यक्षपदी निवड करण्याच्या निर्णयाला सर्वच स्तरातून विरोध होत आहे. कलमाडी हे राष्ट्रकुल स्पर्धेतील आयोजनात आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी तुरुंगात गेले होते. तर चौटाला यांची कारकिर्दही वादग्रस्त आहे. आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग असोसिएशनने २०१३ साली निवडणुकीतील गैरप्रकारामुळे भारतीय हौशी बॉक्सिंग महासंघाची मान्यताच रद्द केली होती. बॉक्सिंग महासंघातील गैरप्रकारांमुळे अभय चौताला वादाच्या भोव-यात सापडले होते.

कलमाडी आणि चौताला यांची नियुक्ती झाल्यावर क्रीडा मंत्री विजय गोएल यांनी आयओएला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. क्रीडा क्षेत्रात पारदर्शकता महत्त्वाची आहे. ते दोघे राजीनामा देत नाही किंवा त्यांची हकालपट्टी होत नाही तोपर्यंत क्रीडामंत्रालय आयओएशी संबंध ठेवणार नाही असे गोएल यांनी सांगितले होते.