बर्मिंगहॅमच्या मैदानावर झालेल्या दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात यजमान इंग्लंडने गतविजेत्या ऑस्ट्रेलियावर ८ गडी राखून मात केली. त्यामुळे अंतिम फेरीत इंग्लंडची गाठ न्यूझीलंडशी पडणार आहे. सलामीवीर जॉनी बेअरस्टो आणि जेसन रॉय यांनी केलेल्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर इंग्लंडने सामन्यात बाजी मारली. ऑस्ट्रेलियाने विजयासाठी दिलेलं २२४ धावांचं आव्हान इंग्लंडच्या फलंदाजांनी सहज पूर्ण करुन दाखवलं. या बरोबर १९९२ नंतर प्रथमच इंग्लंडने अंतिम फेरीत धडक मारली. या अनुभवाबाबत बोलताना ‘अंतिम सामन्यात पोहोचू अशी कल्पनाच केली नव्हती’, असे मत इंग्लंडचा कर्णधार इयॉन मोर्गनने व्यक्त केले.

“ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यातील प्रत्येक चेंडू हा मैदानावर असलेले खेळाडू आणि चेंजिंग रूममधील सारे यांना सुखावणारा होता. सामन्यात सर्वजण १०० टक्के प्रयत्न करताना दिसले. आखलेल्या योजनांची नीटपणे अंमलबजावणी करता आली. कालच्या सामन्यातील साऱ्याच गोष्टी इंग्लंडच्या बाजूने झाल्या. विशेषतः गोलंदाजांनी केलेली कमाल तर वाखाणण्याजोगी होती. संघ म्हणून आम्ही सामना खेळताना क्रिकेटचा आनंद लुटला. जेव्हा आमचा संघ खराब कामगिरी करत होता, तेव्हाही आम्ही खेळाची मजा घेतली आणि चांगले पुनरागमन केले. २०१५ साली आम्ही जेव्हा विश्वचषकातून बाहेर फेकले गेलो, तेव्हा जर २०१९ मध्ये आम्ही अंतिम सामना खेळू असे सांगितले असते, तर मी नक्कीच त्याच्यावर हसलो असतो, कारण आम्ही तशी कल्पनाच केली नव्हती”, असे तो म्हणाला.

दरम्यान, जेसन रॉयने ८५ तर जॉनी बेअरस्टोने ३४ धावा केल्या. हे दोन्ही फलंदाज माघारी परतल्यानंतर जो रुट आणि कर्णधार इयॉन मॉर्गन यांनी संयमीपणे फलंदाजी करत इंग्लंडच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्स यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला.

त्याआधी, यजमान इंग्लंडविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा डाव ४९ षटकात २२३ धावांत आटोपला. स्टीव्ह स्मिथने ८५ धावांची झुंजार खेळी केली. त्याला अलेक्स कॅरी (४६) आणि मिचेल स्टार्क (२९) यांनी चांगली साथ दिली. पण इंग्लंडच्या भेदक माऱ्यापुढे ऑस्ट्रेलियाने केवळ २२३ धावाच केल्या आणि इंग्लंडला २२४ धावांचे आव्हान दिले.

ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली, पण त्यांचा निर्णय काही प्रमाणात फसला. फिंच, वॉर्नर आणि हँड्सकॉम्ब हे तिघे अवघ्या १४ धावांत बाद झाला. पण स्टीव्ह स्मिथ आणि अलेक्स कॅरी यांनी डाव सावरला. कॅरी ४६ धावांवर बाद झाल्यावर स्मिथने डाव पुढे नेला आणि ८५ धावांची झुंजार खेळी केली. पण दुसऱ्या बाजूने त्याला फलंदाजांची साथ न मिळाल्याने ऑस्ट्रेलियाचा डाव २२३ धावांत आटोपला. ख्रिस वोक्स आणि आदिल रशिदने ३-३ तर जोफ्रा आर्चरने २ आणि मार्क वूडने १ गडी बाद केला.