World Cup 2019 IND vs NZ : २०१९ विश्वचषक स्पर्धेत भारत विरूद्ध न्यूझीलंड सामना अखेर पावसामुळे रद्द करण्यात आला. सामना रद्द झाल्यामुळे दोनही संघांना १-१ गुण देण्यात आला. पावसामुळे रद्द झालेला हा आठवड्यातील तिसरा तर स्पर्धेतील चौथा सामना आहे. या १-१ गुणामुळे न्यूझीलंड ४ सामन्यांत ७ गुणांसह अव्वल स्थानी कायम आहे, तर भारतीय संघ ३ सामन्यांत ५ गुणांसह तिसऱ्या स्थानी विराजमान आहे.

आजचा सामना हा नॉटिंगहॅमच्या मैदानावर होणार होता. कालपासूनच या भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात येत होती. त्यानुसार नाणेफेकीच्या नियोजित वेळेच्या आधीपासूनच पावसाने जोर धरला होता. भारतीय वेळेनुसार दुपारी २.३० वा. ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत खेळपट्टीची पाहणी आणि पावसाचा अंदाज घेण्यात आला. पण अखेर पावसाचाच जय झाला.

पहिले दोन सामने जिंकून भारतीय संघाने आश्वासक सुरुवात केली होती. पण सलामीवीर शिखर धवनला झालेल्या दुखापतीचा भारतीय संघाला या सामन्यात फटका बसण्याची शक्यता होती. शिखरच्या अनुपस्थितीत लोकेश राहुल सलामीला फलंदाजीसाठी येईल, त्यामुळे त्याच्या जागी चौथ्या क्रमांकावर कोणता खेळाडू खेळेल आणि धवनच्या जागी कोणत्या खेळाडूला अंतिम ११ मध्ये संधी देण्यात येईल? याकडे साऱ्यांचे लक्ष होते. मात्र नाणेफेकही न झाल्याने हे प्रश्न अनुत्तरीतच राहिले. भारताचा पुढील सामना १६ जूनला पाकिस्तानशी होणार आहे.

दुसरीकडे, न्यूझीलंडच्या संघाने पहिले तीनही सामने जिंकले होते. पण या सामन्यात त्यांना १-१ गुण वाटून घ्यावा लागला. त्यांचा स्पर्धेतील पुढील सामना १९ जूनला दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे.

Live Blog

19:44 (IST)13 Jun 2019
पावसामुळे अखेर सामना रद्द

भारत विरूद्ध न्यूझीलंड सामना अखेर पावसामुळे रद्द करण्यात आला. सामना रद्द झाल्यामुळे दोनही संघांना १-१ गुण देण्यात आला. पावसामुळे रद्द झालेला हा आठवड्यातील तिसरा तर स्पर्धेतील चौथा सामना आहे.

18:13 (IST)13 Jun 2019
पावसामुळे सामन्याला अजूनही सुरुवात नाही

भारतीय वेळेनुसार ६ वाजता खेळपट्टीची पाहणी करण्यात आली. मात्र अद्यापही पावसामुळे सामन्याला सुरुवात झालेली नाही.

17:17 (IST)13 Jun 2019
सामन्याला अद्याप सुरुवात नाही; ६ वाजता होणार पाहणी

पावसाने काही काळ विश्रांती घेतली होती, पण पण सामन्याला अद्यापही सुरुवात झालेली नाही. पुढील पाहणी ६ वाजता होणार आहे.

16:26 (IST)13 Jun 2019
सामन्याला पावसाचा फटका; पुन्हा होणार खेळपट्टीची पाहणी

भारत-न्यूझीलंड सामन्याला पावसाचा फटका बसला असून अद्यापही नाणेफेक झालेली नाही. मात्र  आता पुन्हा एकदा खेळपट्टीची पाहणी करण्यात येणार आहे.

15:45 (IST)13 Jun 2019
पावसामुळे अद्यापही नाणेफेक नाही, सामन्याला विलंब

पाऊस आणि ढगाळ वातावरण यामुळे अद्यापही नाणेफेक होऊ शकलेली नाही. त्यामुळे सामन्यालाही विलंब होताना दिसत आहे.

15:14 (IST)13 Jun 2019
सामन्यावर पावसाचे सावट; पुढील पाहणी ३. ३० वाजता

सामन्यावर अद्यापही पावसाचे सावट आहे. त्यामुळे पुढील पाहणी ३. ३० वाजता होणार आहे.

14:54 (IST)13 Jun 2019
पुन्हा पावसाला जोरदार सुरुवात, सामन्याला विलंब

पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात झाली असून नाणेफेकीला आणि सामन्याला विलंब होत आहे.

--

--

14:35 (IST)13 Jun 2019
पावसामुळे नाणेफेकीला उशीर; ३ वाजता होणार खेळपट्टीची पाहणी

भारत-न्यूझीलंड सामन्यात पावसाचा व्यत्यय य़ेत आहे. पावसामुळे नाणेफेकीला उशीर झाला असून परत पाऊस पडला नाही, तर  ३ वाजता खेळपट्टीची पाहणी करण्यात येणार आहे.