कर्णधार फाफ डु प्लेसिस आणि हाशिम आमला यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकेवर मात केली आहे. ९ गडी राखत आफ्रिकेने हा सामना जिंकला. २०१९ विश्वचषक स्पर्धेतलं आफ्रिकेचं आव्हान संपुष्टात आलेलं असलं तरीही या विजयामुळे श्रीलंकेच्या मार्गात अडथळे निर्माण झाले आहेत. श्रीलंकेला २०३ धावांमध्ये गारद केल्यानंतर आफ्रिकेने हे आव्हान केवळ क्विंटन डी-कॉकच्या विकेटच्या जोरावर पूर्ण केलं.

अवश्य वाचा – Video : श्रीलंका विरुद्ध आफ्रिका सामन्यात मैदानावर माशांचा हल्ला

क्विंटन डी-कॉक लसिथ मलिंगाच्या गोलंदाजीवर माघारी परतल्यानंतर हाशिम आमला आणि फाफ डु प्लेसिस यांनी संघाचा डाव सावरला. श्रीलंकन गोलंदाजांचा समाचार घेत दोन्ही फलंदाजांनी भक्कम भागीदारी रचली. मैदानाच्या चौफेर फटकेबाजी आणि गरजेच्यावेळी एकेरी-दुहेरी धाव घेत दोन्ही फलंदाजांनी धावफलक हलता ठेवला. आमलाने नाबाद ८० तर कर्णधार फाफ डु प्लेसिसने नाबाद ९६ धावांची खेळी केली. श्रीलंकेकडून लसिथ मलिंगाने एकमेव बळी घेतला. श्रीलंकेला आता उपांत्य फेरी गाठायची असल्यास, उरलेले सर्व सामने जिंकून पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्या कामगिरीवर अवलंबून रहावं लागणार आहे.

दरम्यान, प्रिटोरियस, ख्रिस मॉरिस यांच्या भेदक माऱ्यासमोर श्रीलंकेचा डाव अवघ्या २०३ धावांमध्ये आटोपला. नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय आफ्रिकेच्या गोलंदाजांनी सार्थ ठरवला. श्रीलंकेकडून कुशल पेरेरा, फर्नांडो, मेंडीस यांनी थोडीफार झुंज देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचे प्रयत्न अपुरेच पडले.

अवश्य वाचा – World Cup 2019 : श्रीलंकन कर्णधाराची ‘करुण’ कहाणी

कगिसो रबाडाने पहिल्याच चेंडूवर श्रीलंकन कर्णधार दिमुथ करुणरत्नेला माघारी धाडलं. यानंतर पेरेरा आणि फर्नांडो यांनी छोटेखानी भागीदारी रचत संघाचा डाव सावरला. प्रेटोरियसने फर्नांडोला माघारी धाडत लंकेची जोडी फोडली. यानंतर श्रीलंकेचे सर्व फलंदाज ठराविक अंतराने माघारी परतत राहिले. दक्षिण आफ्रिकेकडून ड्वेन प्रेटोरियस, ख्रिस मॉरिस यांनी प्रत्येकी ३-३ तर कगिसो रबाडाने २ बळी घेतले. फेलुक्वायो आणि जे.पी.ड्युमिनी यांनी १-१ बळी घेत त्यांना चांगली साथ दिली.