आयसीसी ही आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळल्या जाणाऱ्या क्रिकेटचे नियम आणि अटी ठरवणारी एक परिषद आहे, हे क्रिकेटरसिकांना ठाऊक आहे. कसोटी, एकदिवसीय आणि टी२० अशा तिन्ही प्रकारात खेळ कसा खेळण्यात यावा, याचे अधिकार या परिषदेला देण्यात आले आहेत. अगदी क्रिकेट खेळ कशा पद्धतीने खेळले जावे? ते फलंदाजाला बाद कसे ठरवण्यात यावे? किंवा सामने किती षटकांचे असावेत? यापासून बॅटचे किंवा चेंडूचे आकारमान आणि वजन किती असावे? या सर्व गोष्टी आंतरराष्ट्रीय पातळीवर ‘आयसीसी’तर्फे ठरवल्या जातात आणि त्याचे पालन देशभरातील क्रिकेटपटू करतात.

फलंदाजाला कशा पद्धतीने बाद ठरवण्यात यावे? आणि फलंदाज किती पद्धतीने बाद होऊ शकतो? हेदेखील निर्णय आयसीसी घेते. मात्र आयसीसी केवळ आंतरराष्ट्रीय सामन्यांमधील निर्णयप्रक्रिया पार पडते. भारतातील आयपीएल, ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लीग किंवा इंग्लंडमधील काऊंटी क्रिकेटसारख्या मोठ्या स्पर्धांतही आयसीसी आपले मतप्रदर्शन करत नाही. मात्र, एखाद्या स्थानिक मैदानावर गल्ली क्रिकेटसारख्या सामन्यासाठी आयसीसीने निर्णय दिला असेल तर?

हे वाचून नक्कीच आश्चर्य वाटलं असेल ना… मात्र असं खरंच घडलं आहे. एका स्थानिक मैदानावर काही मुले क्रिकेट खेळत होती. या गल्ली क्रिकेटमध्ये गोलंदाजाने चेंडू टाकला. मात्र मैदानावरील खड्डे आणि सुसाट वाहणारा वारा यामुळे चेंडू खूप विचित्र पद्धतीने वळला आणि सरपटून जात स्टंप म्हणून लावलेल्या दगडाला धडकला. त्यानंतर गोलंदाज आणि इतर खेळाडूंनी फलंदाज बाद झाल्याने जल्लोष सुरु केला. मात्र फलंदाज स्वतःला बाद मानण्यास तयार नव्हता. अखेर काही वेळाने तो बाद मानून खेळपट्टीवर बाजूला जाऊ लागला.

दरम्यान, फलंदाज बाद होण्यावरून वाद झाल्याने एकाने हा व्हिडीओ आयसीसीला ट्विट केला आणि आयसीसीनेच यावर निर्णय द्यावा, असे म्हंटले.

त्यावर आयसीसीने स्वतः हा व्हिडीओ ट्विटर हॅण्डल वरून ट्विट केला आणि त्यावर लिहिले की हमझा नावाच्या एका चाहत्याने हा व्हिडीओ आम्हाला पाठवला होता आणि त्यावर निर्णय विचारला होता. दुर्दैवाने नियम ३२.१ अन्वये या फलंदाज बाद आहे, अशा निर्णयाचे ट्विट त्यांनी केले आहे.

हा व्हिडीओ आणि ट्विट प्रचंड व्हायरल झाले असून लोकांनी आयसीसीच्या कौतुक केले आहे.