आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) सोमवारी क्रिकेट वर्ल्ड कप सुपर लीगची (ICC Cricket World Cup Super League) घोषणा केली. आयर्लंड आणि विश्वविजेते इंग्लंड यांच्यात ३० जुलैपासून खेळवण्यात येणाऱ्या क्रिकेट मालिकेने या लीगची सुरूवात होणार आहे. इंग्लंडचा संघ आयर्लंडशी तीन वन डे सामन्यांची मालिका खेळणार आहे. याच मालिकेच्या माध्यमातून क्रिकेट विश्वचषक सुपर लीगचा श्रीगणेशा होईल. या लीग अंतर्गत खेळवण्यात येणारे सामने हे २०२३ मध्ये भारतात होणाऱ्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील पात्रता सामने असतील. यजमान भारत आणि सुपर लीगमधील अव्वल सात संघ यांना विश्वचषक स्पर्धेत स्थान मिळणार आहे.

ICCचे पूर्ण सदस्यत्व असलेले १२ संघ आणि वर्ल्ड क्रिकेट सुपर लीग २०१५-१७ चे विजेते नेदरलँड्स असे १३ संघ या नव्या सुपर लीगमध्ये स्पर्धेत खेळतील. प्रत्येक संघ घरच्या मैदानावर आणि परदेशात ४-४ वन डे मालिका खेळेल. प्रत्येक वन डे मालिका ही ३ सामन्यांचीच असेल. या स्पर्धेत जो संघ थेट पात्र ठरणार नाही, त्याला क्वालिफायर २०२३ मध्ये पाच सहकारी संघासह खेळून आपले स्थान पक्के करावे लागेल. अशा प्रकारे दोन संघ निवडले जातील आणि भारतात १० संघांमध्ये मूळ विश्वचषक स्पर्धा खेळवली जाईल.