ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धा लांबणीवर पडल्याचा परिणाम

नवी दिल्ली : करोनाच्या साथीमुळे ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धा दीड वर्षांने लांबणीवर पडल्यामुळे महेंद्रसिंह धोनी, ख्रिस गेल, ड्वेन ब्राव्हो, लसिथ मलिंगा, आदी अनुभवी क्रिकेटपटूंच्या कारकीर्द धोक्यात आल्या आहेत.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून (आयसीसी) दर दोन वर्षांनी किंवा वर्षभराने होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले जात असते. यंदाही ऑक्टोबर महिन्यात ऑस्ट्रेलियात विश्वचषक स्पर्धा होणार होती. परंतु करोनाच्या साथीमुळे २०१६नंतर साडेपाच वर्षांच्या अंतराने आता पुढील स्पर्धेच्या तारखा निश्चित केल्या आहेत. मात्र साथ आटोक्यात आली नाही, तर ती स्पर्धासुद्धा होईल की नाही याची शाश्वती नाही. त्यामुळे काही मातब्बर क्रिकेटपटूंना आपल्या कारकीर्दीचा पुनर्विचार करावा लागणार आहे.

भारताला पहिल्या ट्वेन्टी-२० विश्वचषकाचे जेतेपद जिंकून देणाऱ्या धोनीने नुकतेच ३९व्या वर्षांत पदार्पण केले. २०१९मध्ये झालेल्या एकदिवसीय विश्वचषकातील उपांत्य सामन्यानंतर धोनी एकही सामना खेळलेला नाही. ट्वेन्टी-२० विश्वचषकानंतर धोनी निवृत्त होणार अशी चर्चा होती. पण आता विश्वचषक लांबणीवर पडल्याने धोनी खेळेल का, हे गूढ लवकरच उकलू शकेल.

ट्वेन्टी-२० विश्वचषक खेळण्याच्या इराद्याने ब्राव्होने वर्षांच्या पूर्वार्धात निवृत्तीचा निर्णय मागे घेतला होता. वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळातील स्थित्यंतर आणि किरॉन पोलार्डचे नेतृत्व संघासाठी फलदायी ठरेल, अशी अशा ब्राव्होला होती. त्यामुळे विश्वविजेतेपद टिकवण्याच्या विंडीजच्या प्रयत्नात पुढील वर्षी ३८ वर्षांचा होणारा ब्राव्हो असेल का, याबाबत साशंका आहे. गेल वर्षभरापूर्वी विंडीज संघातून खेळला होता. लेंडल सिमन्स आणि ब्रँडन किंग यांनी उत्तम जोडी जमवली असताना वेस्ट इंडिजच्या दृष्टीने पुढील वर्षी ४२ वर्षांचा होणाऱ्या गेलचा विचार करणे कठीण आहे.

एबी डी’व्हिलियर्सने निवृत्ती पत्करली असली तरी कर्णधार क्विंटन डीकॉकला तो ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी संघात हवा आहे. पुढील वर्षी ३८ वर्षांच्या होणाऱ्या डी’व्हिलियर्सने मात्र निवृत्तीच्या माघारीचा निर्णय अद्याप घेतलेला नाही.