अ‍ॅशेस मालिकेत उत्तम कामगिरी करणाऱ्या स्टीव्ह स्मिथने कसोटी क्रमवारीतील आपले अव्वलस्थान कायम राखले आहे. तर विराट कोहली दुसऱ्या स्थानी कायम आहे. ICC ने नुकतीच कसोटी क्रमवारी जाहीर केली. या क्रमवारीत भारताच्या पारड्यात फार काही पडले नसले, तरी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या खेळाडूंना क्रमवारीत बढती मिळाली आहे.

स्मिथने अ‍ॅशेस मालिकेतील ४ सामन्यात संघाचे प्रतिनिधित्व केले. एका सामन्यात त्याला दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली होती. पण त्याने केलेल्या ४ सामन्यात त्याने तब्बल ७७४ धावा केल्या. महत्वाचे म्हणजे त्याने सलग ६ डावात ८० पेक्षा अधिक धावा केल्या. स्मिथने अ‍ॅशेस मालिकेतील सहा डावात १४४, १४२, ९२, २११, ८२ आणि ८० अशा धावा केल्या. असे ८०+ धावांचा ‘षटकार’ लगावणारा स्मिथ हा कसोटी क्रिकेटमधील केवळ दुसराच फलंदाज ठरला. त्यामुळे स्मिथ ९३७ गुणांसह अव्वलस्थानी कायम आहे, तर ९०३ गुणांसह कोहली दुसऱ्या स्थानी स्थिर आहे. ऋषभ पंतने देखील बढती घेत २१ वे स्थान पटकावले आहे.

शतकी खेळी करणाऱ्या मॅथ्यू वेडने ३२ स्थानांची झेप घेत ७८ वे स्थान मिळवले आहे. तर मिचेल मार्शने गोलंदाजांच्या क्रमवारीत २० स्थानांची झेप घेत ५४ वे स्थान पटकावले आहे. पॅट कमिन्स अव्वलस्थानी कायम आहे. सलामीवीर डेव्हिड वॉर्नरची मात्र ७ स्थानांनी घसरण झाली असून तो २४ व्या स्थानी फेकला गेला आहे. इंग्लंडच्या संघातील वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर याला प्रथमच टॉप ४० मध्ये स्थान मिळाले आहे, तर सॅम करन ६ स्थानांची बढती घेत ६५ व्या स्थानी विराजमान झाला आहे.