विंडीज आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्यात विंडीजच्या भेदक माऱ्यापुढे ऑस्ट्रेलियाच्या सुरुवातीच्या फलंदाजांची भंबेरी उडाली, पण ऑस्ट्रेलियाच्या तळाच्या फलंदाजांनी जोरदार तडाखा देत विंडीजला २८९ धावांचे आव्हान दिले. ५ बाद ७९ धावा अशी अवस्था असताना नॅथन कुल्टर-नाईल (९२), स्टीव्ह स्मिथ (७३) आणि ऍलेक्स कॅरी (४५) या तिघांनी धमाकेदार खेळी केली आणि ऑस्ट्रेलियाला २८८ धावांपर्यंत मजल मारून दिली.

विंडीजचा कर्णधार जेसन होल्डर याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधाराचा हा निर्णय विंडीजच्या वेगवान गोलंदाजांनी सार्थ ठरवला होता. विंडीजच्या भेदक माऱ्यापुढे ऑस्ट्रेलियाच्या सुरुवातीच्या फलंदाजांची भंबेरी उडाली. उत्तम लयीत असलेल्या डेव्हिड वॉर्नर आणि आरोन फिंच यांनी चांगली सुरुवात करून देण्याची अपेक्षा होती, पण शेल्डन कॉट्रेल, ओशेन थॉमस आणि आंद्रे रसल या तिघांनी त्यांच्या अपेक्षांना सुरुंग लावला.

ऑस्ट्रेलियाच्या डावाची सुरुवात अतिशय खराब झाली. १५ या धावसंख्येवर ऑस्ट्रेलियाला पहिला गडी गमवावा लागला. थॉमसने फिंचला ६ धावांवर माघारी धाडले. पाठोपाठ डेव्हिड वॉर्नरला कॉट्रेलने तंबूचारस्ता दाखवला. वॉर्नरला केवळ ३ धावा करता आल्या. त्यानंतर आलेल्या उस्मान ख्वाजा आणि स्टीव्ह स्मिथ यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचा हा प्रयत्न आंद्रे रसलने हाणून पाडला. बाहेरच्या दिशेने जाणाऱ्या चेंडूवर फटका खेळण्याचा मोह ख्वाजाला आवरला नाही. त्याने फटका खेळला. पण त्याच्या बॅटची कड लागून चेंडू यष्टिरक्षकाकडे गेला. यष्टीरक्षक शाय होप याने अप्रतिम उडी मारून त्याचा झेल टिपला.

हा पहा व्हिडीओ –

त्यानंतर ख्वाजा १९ चेंडूत २ चौकरांसह १३ धावा केल्या. त्यानंतर लगेचच ग्लेन मॅक्सवेलही २ चेंडू खेळून बाद झाला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाची अवस्था डावाच्या सुरूवातीला ४ बाद ३८ अशी झाली होती. स्टॉयनीसदेखील १९ धावांवर माघारी परतला. स्टीव्हन स्मिथ आणि नॅथन कुल्टर-नाईल या दोघांनी मात्र दमदार फलंदाजी केली. या दोघांनी १०२ धावांची भागीदारी केली. स्मिथ बाद झाला, तरीही कुल्टर-नाईलने फटकेबाजी सुरूच ठेवली. त्याने ६० चेंडूत ९२ धावा केल्या. त्यात त्याने ८ चौकार आणि ४ षटकार खेचले. स्टीव्हन स्मिथने ७३ धावा केल्या. तर कॅरीने ४५ धावा केल्या.