भारताचा ‘गब्बर’ खेळाडू शिखर धवन याला अंगठ्याच्या दुखापतीमुळे तीन आठवड्यांची विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. या दुखापतीमुळे तो किमान पुढील २ सामान्यांना मुकणार आहे. परंतु दुखापत काळात धवन इंग्लंडमध्येच थांबणार असून BCCI ची वैद्यकीय टीम त्याच्या प्रकृतीची देखरेख करणार आहे. BCCI ने याबाबत माहिती दिली. धवनला पर्यायी बदली खेळाडू म्हणून भारतातून कोण रवाना होणार याबाबत BCCI ने कोणतीही माहिती दिली नसल्याने धवनला पर्याय नाही असेच चित्र दिसून येत आहे. पण धवनच्या प्रकृतीत सुधारणा न झाल्यास ‘स्टॅंड-बाय’ खेळाडू असलेल्या ऋषभ पंतला इंग्लंडवारी घडण्याची शक्यता आहे.

‘भारताचा सलामीवीर शिखर धवन हा सध्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) वैद्यकीय टीमच्या देखरेखीखाली आहे. दुखापतीच्या काळात शिखर धवन हा भारतीय संघाबरोबर इंग्लंडमध्येच थांबेल आणि त्याच्या प्रकृतीवर व दुखापतीवर BCCI देखरेख ठेवेल असा निर्णय संघ व्यवस्थापनाने घेतला आहे’, असे ट्विट BCCI कडून करण्यात आले आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात शिखर धवनच्या हातावर चेंडू आदळला होता. यामुळे शिखरच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. शिखरचा अंगठा फ्रॅक्चर झाल्याचे वैद्यकीय तपासणीतून समोर आले असून त्याला किमान तीन आठवडे विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. यामुळे शिखर धवनला नक्की किती काळ क्रिकेटपासून दूर राहावे लागेल हे सांगण्यात आलेले नाही. शिखर दुखापतग्रस्त झाल्याने त्याच्या जागी ऋषभ पंत किंवा इतर बदली खेळाडू भारतातून रवाना करण्यात येईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. परंतु BCCI ने त्या प्रकारची कोणतीही घोषणा केलेली नसल्याने सध्या तरी त्या चर्चांना पूर्णविराम मिळाला असून धवनला पर्याय नाही असेच BCCI चे म्हणणे असल्याचे दिसून येत आहे.