World Cup 2019 या स्पर्धेसाठी भारतीय संघाची १५ एप्रिलला घोषणा करण्यात आली. या संघात कर्णधार विराट कोहली, उपकर्णधार रोहित शर्मा, शिखर धवन, जसप्रीत बुमराह, महेंद्रसिंग सिंग धोनी, मोहम्मद शमी, हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल या खेळाडूंची संघातील जागा पक्की मानली जात होतीच. त्याशिवाय चार ते पाच जागांसाठी प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. त्यानंतर लोकेश राहुल, विजय शंकर, केदार जाधव, दिनेश कार्तिक आणि रवींद्र जाडेजा यांना संधी देण्यात आली. या खेळाडूंसाठी भारतीय संघाकडून सर्वाधिक विश्वचषक स्पर्धा खेळलेला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने मोलाचा सल्ला दिला आहे.

“१९९२ नंतर प्रथमच राऊंड रॉबिन पद्धतीने विश्वचषक स्पर्धा खेळवण्यात येत आहे. आपल्या देशाचे आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिनिधित्व करणे ही खूपच गौरवाची बाब असते. विश्वचषक स्पर्धा खेळणे ही एखाद्या खेळाडूची सर्वोच्च पातळी असते. त्यामुळे या दोनही गोष्टी लक्षात ठेवून जेव्हा एखादा खेळाडू खेळतो, तेव्हा त्याने केलेली कामगिरी आणि त्याच्या कामगिरीचा परिणाम हा लोकांच्या मनात कायमचे घर करतो. त्यामुळे या स्पर्धेतील सामन्यांचा अंदाज घेऊन त्याप्रमाणे स्वतःला आणि पर्यायाने संघाला गती मिळवून द्या”, असा सल्ला सचिनने दिला आहे.

“या स्पर्धेत प्रत्येक संघाला प्रत्येक संघाशी सामना खेळायचा आहे. त्यामुळे ही स्पर्धा खूपच लांबलचक होणार आहे. अशा परिस्थितीमध्ये योग्य पद्धतीने स्पर्धेला सामोरे जाणे महत्वाचे आहे. कारण जर स्पर्धेत टिकून राहायचे असेल तर कामगिरीचा स्तर समान राखणे हे खूप मोठे आव्हान असणार आहे. भारतीय संघाने केवळ कामगिरीवर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. तसे केल्यास निकाल नक्कीच भारताच्या बाजूने लागू शकतो”, असेही सचिनने सांगितले.

विश्वचषकासाठी १५ जणांची टीम इंडिया –

विराट कोहली (कर्णधार)
रोहित शर्मा (उपकर्णधार)
शिखर धवन
लोकेश राहुल
महेंद्रसिंग धोनी (यष्टीरक्षक)
हार्दिक पांड्या
विजय शंकर
केदार जाधव
मोहम्मद शमी
भुवनेश्वर कुमार
कुलदीप यादव
युझवेंद्र चहल
दिनेश कार्तिक (राखीव यष्टीरक्षक)
जसप्रित बुमराह
रवींद्र जाडेजा