22 November 2019

News Flash

World Cup 2019 : मॉर्गन नवा ‘सिक्सर किंग’; १७ षटकारांसह मोडला रोहितचा विक्रम

मॉर्गनच्या वादळी खेळीमुळे अफगाणिस्तानच्या गोलंदाजांची उडाली धूळधाण

कर्णधार मॉर्गन

अफगाणिस्तानविरुद्धच्या विश्वचषक स्पर्धेच्या सामन्यात इंग्लंडने तुफान फटकेबाजीच्या जोरावर ३९७ धावांपर्यंत मजल मारली. कर्णधार मॉर्गनच्या १४८ धावा आणि सलामीवीर बेअरस्टो (९०), जो रूट (८८) यांची अर्धशतके यांच्या बळावर इंग्लंडने अफगाणिस्तानला ३९८ धावांचे आव्हान दिले. या सामन्यात कर्णधार ऑईन मॉर्गन याने तुफानी खेळी केली.

मॉर्गनने ७१ चेंडूंमध्ये तब्बल १७ षटकार आणि ४ चौकार लगावले. या षटकारांच्या जोरावर एकदिवसीय सामन्यात एका डावात सर्वाधिक षटकार खेचण्याचा विक्रम मॉर्गनने आपल्या नावे केला. या आधी रोहित शर्माने द्विशतकी खेळी केली होती. त्या खेळीत त्याने १६ षटकार खेचले होते. तो विक्रम आज मॉर्गनने मोडीत काढला. त्याने अत्यंत तडाखेबंद खेळी करत सामना पूर्णपणे इंग्लंडच्या बाजूने झुकवला आणि विक्रम रचला.

दरम्यान, सामन्यात नाणेफेक जिंकून इंग्लंडचा कर्णधार ऑईन मॉर्गन याने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. ४४ धावांच्या सलामी भागीदारी नंतर विन्स २६ धावांवर बाद झाला. त्यानंतर जो रूटच्या साथीने बेअरस्टोने डाव सांभाळला. या दोघांनी १२० धावांची भागीदारी केली. अर्धशतकी खेळी करणारा बेअरस्टो शतकाला मात्र मुकला. ९० धावांवर मोठा फटका खेळताना तो बाद झाला. जो रुटने आपली खेळी चालू ठेवली आणि कर्णधार मॉर्गनच्या साथीने खेळत आपले अर्धशतक पूर्ण केले.

रूटचे अर्धशतक पूर्ण झाल्यावर मॉर्गनने खेळाची दिशा पूर्णपणे बदलून टाकली. त्याने तुफानी फटकेबाजी करत केवळ ५७ चेंडूत १०० धावांचा पल्ला गाठला. इतकेच नव्हे तर त्याने तब्बल १७ षटकार आणि ४ चौकार यांच्या मदतीने ७१ चेंडूत १४८ धावांची खेळी केली. मोठा फटका खेळताना रूट आणि मॉर्गन दोघेही एकाच षटकात माघारी परतले. त्यानंतर मोईन अलीने ४ षटकार आणि १ चौकार खेचत ९ चेंडूत नाबाद ३१ धावा केल्या आणि संघाला ५० षटकात ६ बाद ३९७ धावांची मजल मारून दिली.

अफगाणिस्तानकडून दौलत झादरान आणि गुलाबदिन नैब या दोघांनी ३ -३ गडी बाद केले.

First Published on June 18, 2019 7:08 pm

Web Title: icc world cup 2019 england captain eoin morgan sixer king most sixes in odi inning record rohit sharma vjb 91
Just Now!
X