१४ फेब्रुवारी २०१९ रोजी भारतासह देशभरात ‘व्हॅलेन्टाईन्स डे’ साजरा केला जात असताना पुलवामा येथे दहशतवादी हल्ला झाला. ४० CRPF जवानांना या हल्ल्यात हौतात्म्य आलं. हा हल्ला जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेकडून करण्यात आला होता आणि या संघटनेचा तळ पाकव्याप्त काश्मीरमध्ये होता. त्यामुळे भारताने पाकिस्तानशी असेलेले सर्व प्रकारचे संबंध तोडून टाकावेत, असा सूर भारतभरातून उमटू लागला. यावेळी माजी क्रिकेटपटू आणि नवनिर्वाचित खासदार गौतम गंभीर यांनी भारताने विश्वचषक स्पर्धेतही भारताशी सामना खेळू नये असे मत व्यक्त केले होते. यावरून पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहीद आफ्रिदी याने गौतम गंभीरवर बोचरी टीका केली आहे.

विश्वचषक स्पर्धा ही आंतरराष्ट्रीय दर्जाची स्पर्धा असते. अशा स्पर्धांमध्ये प्रत्येक संघ जे बोलतो किंवा वागतो त्याचे पडसाद पूर्ण जगात उमटतात. गौतम गंभीर यांनी भारताने पाकिस्तानशी क्रिकेट सामना खेळू नये असे जे विधान केले आहे त्यावर उत्तर देताना शाहिद आफ्रिदी म्हणाला की एखादा समतोल विचार करणारा व्यक्ती अशा पद्धतीचे वक्तव्य करू शकेल का? तसेच शिक्षित लोक अशाप्रकारची विधानं करतात का?” असा टोला लगावत गंभीर अशिक्षित माणसासारखं का बोलतो आहे? असा सवाल त्याने केला.

जेव्हा पुलवामा हल्ला झाला होता, तेव्हा गंभीरने आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. “फुटीरतावाद्यांशी चर्चा करतो, पाकिस्तानशी चर्चा करतो, मात्र आता ही बातचीत टेबलवर नको, युध्दभूमीत व्हायला हवी. आता सहनशक्ती संपली आहे”, असा संताप गंभीरने व्यक्त केला होता. तसेच “भारताने पाकिस्तानशी सामना खेळावा की नाही हा निर्णय पूर्णपणे BCCI चा असणार आहे. पण मला वैयक्तिक मत विचारलं तर एक सामना सोडून देण्यास काही हरकत नाही. दोन पॉईंट्स इतके काही महत्त्वाचे नाहीत. माझ्यासाठी देशाचा जवान कोणत्याही क्रिकेटपेक्षा जास्त महत्त्वाचा आहे. मी देशाला प्राधान्य देतो”, असेही मत गंभीर यांनी व्यक्त केले होते.