भारतीय संघ विश्वचषक स्पर्धेत उपांत्य फेरीत पराभूत झाला. त्या सामन्यात माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी धावबाद झाला आणि भारताच्या विजयाच्या आशा मावळल्या. या सामन्यानंतर धोनी निवृत्तीची घोषणा करेल असा अंदाज क्रिकेटवर्तुळात व्यक्त करण्यात येत होता, पण धोनीने ते अद्याप तरी केलेले नाही. धोनीला सन्मानाने निवृत्ती घेण्याचा सल्ला टीम इंडियाच्या निवड समितीने दिल्याचे सांगण्यात येत आहे. या दरम्यान भारतीय वन डे संघात आता धोनी यष्टीरक्षक म्हणून पहिली पसंती नसेल असे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.

महेंद्रसिंग धोनी विंडीज दौऱ्यावर जाणार नाही. मायदेशात किंवा परदेशात जेव्हा भारतीय संघाचे दौरे असतील, तेव्हा ऋषभ पंत हा यष्टीरक्षक म्हणून कायम पहिली पसंती असेल. धोनीला यापुढे पहिली पसंती दिली जाणार नाही. ऋषभ पंत हा नवखा खेळाडू असल्याने त्याला जास्तीत जास्त संधी देऊन त्याला परिपक्व करण्यावर निवड समिती भर देणार आहे. या प्रक्रियेत धोनी ऋषभला मदत करेल. धोनी १५ जणांच्या चमूत असेल पण त्याला अंतिम ११ मध्ये संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. सध्या संघाला मार्गदर्शन करणारा आणि पाठीवर थाप देणारा हात हवा आहे. अशा परिस्थितीमध्ये धोनीने निवृत्ती स्वीकारणे संघासाठी घातक ठरू शकते, असे सूत्रांनी सांगितल्याचे वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिले आहे.

धोनीने स्वतःला एक क्रिकेटपटू म्हणून सिद्ध केले आहे. तो नक्कीच निवृत्त होईल, पण इतकी काय घाई आहे. कोणत्याही खेळाडूपेक्षा त्याला पहिली पसंती का दिली जाते हे त्याने वेळोवेळी दाखवून दिले आहे, असेही सांगण्यात आले आहे. गुरुवारी, १८ जुलैला विंडीज दौऱ्यासाठी संघ निवड होणार आहे.