जागतिक स्तरावर पाच वेळा विजेतेपद मिळविले असले तरी स्पर्धात्मक बुद्धिबळातून निवृत्त होण्याचा मी विचार केलेला नाही. मला अद्यापही सर्वोत्तम कामगिरीची अपेक्षा आहे, असे भारताचा ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद याने येथे सांगितले.
‘‘जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत मला मॅग्नस कार्लसनविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला असला तरी यंदा माझी कामगिरी समाधानकारक झाली आहे. खरे तर या स्पर्धेत मला विजेतेपद मिळविता आले असते. मात्र मिळालेल्या संधींचा लाभ मला घेता आला नाही. लंडन क्लासिक स्पर्धेसह तीन स्पर्धामध्ये मला विजेतेपद मिळाले आहे. या विजेतेपदांमुळे माझा उत्साह वाढला आहे. पुढील वर्षी सर्वोत्तम कामगिरी करण्याचे माझे ध्येय आहे. नवीन काही स्पर्धामध्ये भाग घेण्याचा माझा विचार आहे,’’ असेही आनंदने सांगितले.
‘‘प्रशिक्षक म्हणून काम करण्याचा सध्या तरी विचार नाही. मी सध्या माझ्या खेळावरच अधिक लक्ष देत आहे. एकाच वेळी प्रशिक्षक व खेळाडू अशा दोन्ही भूमिका करणे अवघड आहे. अजूनही माझी कारकीर्द संपलेली नाही. आणखी काही वर्षे खेळण्याचा माझा विचार आहे. परदेशात चांगले प्रशिक्षक असले तरी आपल्या देशातही प्रशिक्षकांची कमतरता नाही व ते सहज उपलब्ध होऊ शकतात. शैक्षणिक अभ्यासक्रमात या खेळाचा समावेश करण्याची संकल्पना चांगली आहे. त्यामुळे लहान वयात मुले-मुली बुद्धिबळ आत्मसात करू शकतील,’’ असे आनंदने सांगितले.