पाकिस्तान क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक मिकी आर्थर यांचा कालावधी संपुष्टात आला असला तरी पाकिस्तान क्रिकेट मंडळातील (पीसीबी) एका गटाने त्यांना दोन वर्षांची मुदतवाढ देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्यांच्या मुदतवाढीचा प्रस्ताव पाकिस्तानचे पंतप्रधान आणि पीसीबीचे मुख्य विश्वस्त इम्रान खान यांनी फेटाळून लावला.

‘‘आपल्याला मुदतवाढ मिळणार या इराद्याने आर्थर हे पाकिस्तानातच तळ ठोकून होते. पण विद्यमान प्रशिक्षकांना कोणतीही मुदतवाढ मिळणार नाही, हे कळल्यानंतर ते निराश झाले आहेत,’’ असे पीबीसीमधील सूत्रांनी सांगितले. पीसीबीचे अध्यक्ष एहसान मणी यांनी इम्रान खान यांची भेट घेऊन यासंदर्भात विचारणा केली होती. पण पाकिस्तानला विश्वविजेतेपद मिळवून देणारे कर्णधार इम्रान खान यांनी नवे संघव्यवस्थापनच प्रशिक्षकांची नियुक्ती करेल, असे स्पष्ट केले आहे.