फिरकीपटू इम्रान ताहीरने केलेल्या भेदक माऱ्याच्या जोऱ्यावर दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या वन-डे सामन्यात झिम्बाब्वेवर १२० धावांनी मात केली. २४ धावांमध्ये ६ बळी घेत ताहिरने झिम्बाब्वेचा निम्मा संघ माघारी धाडला. यादरम्यान ताहिरने झिम्बाब्वेच्या ब्रेंडन टेलर, सिन विल्यम्स आणि एल्टन चिगुंबुराला लागोपाठ माघारी धाडत हॅटट्रिकची नोंद केली. अशी कामगिरी करणारा इम्रान ताहिर दक्षिण आफ्रिकेचा चौथा गोलंदाज ठरला आहे.

अवश्य वाचा – … तर क्रिकेट सोडून देईन – इम्रान ताहीर

सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करत असताना दक्षिण आफ्रिकेच्या संघाला १९८ धावांमध्ये बाद करण्यात झिम्बाब्वेचे गोलंदाज यशस्वी ठरले. आफ्रिकेकडून एडन मार्क्रमने ३५ तर तळातल्या डेल स्टेनने ६० धावांची अर्धशतकी खेळी केली. झिम्बाब्वेकडून तेंडाई चटाराने ३ तर ब्रँडन मावुटा, डोनाल्ड टिरीपॅनो आणि कायले जार्विस यांनी प्रत्येकी २-२ बळी घेतले.

प्रत्युत्तरादाखल झिम्बाब्वेच्या फलंदाजांनी सुरुवातीपासूनच आफ्रिकेसमोर शरणागती पत्करली. कर्णधार हॅमिल्टन मासाकात्झा, ब्रेंडन टेलर आणि डोनाल्ड टिरीपॅनो या ३ फलंदाजांना दोन आकडी धावसंख्या गाठता आली. उर्वरित सर्व फलंदाज ताहिर व अन्य गोलंदाजांची शिकार होऊन माघारी परतले. या विजयासह आफ्रिकेने ३ सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतलेली आहे.