विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-२० मालिकेत २-१ ने बाजी मारत वन-डे मालिकेतल्या पराभवाचा वचपा काढला. वन-डे आणि टी-२० मालिकेत टीम इंडियासाठी लोकेश राहुलने यष्टीरक्षण केलं. धोनीचा वारसदार मानला जाणाऱ्या ऋषभ पंतला या दौऱ्यात वन-डे आणि टी-२० संघात स्थान नाकारण्यात आलं. ऋषभची निवड ही फक्त कसोटी संघासाठी करण्यात आली. परंतू ऑस्ट्रेलिया अ संघाविरुद्ध पहिल्या ३ दिवसीय सराव सामन्यातही भारताने वृद्धीमान साहाला यष्टीरक्षणाची संधी दिली. ज्यावरुन कसोटी मालिकेतही भारत साहाला पहिली पसंती देणार असल्याचे संकेत मिळत आहेत. भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राने ऋषभ पंतच्या बॅड पॅचवर भाष्य करताना तो ऑस्ट्रेलियात फक्त फिरण्यासाठी गेला आहे असं म्हटलंय.

आणखी वाचा- अजिंक्य रहाणे आक्रमक कर्णधार ! इयन चॅपल यांच्याकडून कौतुक

“ऋषभ सध्या भारतीय यष्टीरक्षकांच्या यादीत सर्वात शेवटच्या स्थानावर आहे. भारत अ संघाच्या पहिल्या सराव सामन्यात व्यवस्थापनाकडे साहा आणि पंत या दोन्ही खेळाडूंना खेळवण्याची संधी होती. परंतू त्यांनी असं केलं नाही. एक गोलंदाज कमी खेळवला असता तर सराव सामन्यात पंत कशी फलंदाजी करतो आहे हे पाहता आलं असतं. पण पहिल्या सामन्यात त्याला संधी मिळाली नाही; वन-डे, टी-२० संघात तो नव्हता त्यामुळे तो ऑस्ट्रेलियात फक्त फिरण्यासाठी गेलाय असं वाटतं.” आकाश चोप्रा आपल्या यु-ट्यूब चॅनलच्या कार्यक्रमात बोलत होता.

आणखी वाचा- टी-२० विश्वचषक जिंकायचा असेल तर फिल्डिंग सुधारणं गरजेचं, मोहम्मद कैफचा भारतीय खेळाडूंना सल्ला

दरम्यान, वन-डे आणि टी-२० मालिका पार पडल्यानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी सज्ज झाला आहे. १७ डिसेंबरपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अॅडलेडच्या मैदानावर दिवस-रात्र कसोटी सामना खेळवला जाणार आहे.