भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाच्या भूमीत पहिल्या कसोटी सामन्यात यजमानांना ३१ धावांनी पराभूत केले आणि मालिकेची विजयी सुरुवात केली. या सामन्यात भारतीय फलंदाजांनी उल्लेखनीय कामगिरी केली. भारतीय फलंदाजांना काही वेळा पंचांनी बाद ठरवले, पण DRS ने त्या फलंदाजांना तारले. यानंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेन याने DRS ही अचूक पद्धत नाही, असा रडीचा डाव खेळायला सुरुवात केली आहे.

DRS ही एक प्रणाली आहे. ही पद्धत अचूक नाही. मी याबाबत जेव्हा प्रश्न उपस्थित करतो, तेव्हा मला त्याचे उत्तर मिळत नाही. मला ही पद्धत फार त्रासदायक वाटते. पण ती पद्धत जशी आहे, तशीच आहे. ती अचूक नाही हे माझं मत आहे, असे पेन म्हणाला. सिडनी मॉर्निंग हेराल्ड या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्याने हे भाष्य केले.

भारताच्या पहिल्या डावात नॅथन लॉयनने पुजाराला ८ धावांवर आणि १७ धावांवर असताना पायचीत केले होते. पंचांनी बाद दिल्यावर पुजाराने DRS ची मदत घेतली आणि दोनही वेळी पंचांचा निर्णय चूक असल्याचे दिसले. त्या डावात पुजाराने १२३ धावा केल्या आणि सामना भारताच्या दिशेने झुकण्यासाठी महत्वाची खेळी केली. त्यानंतर दुसऱ्या डावात अजिंक्य रहाणे याने अर्धशतकी चिवट खेळी केली. तोदेखील १७ धावांवर असताना त्याला बाद ठरवण्यात आले होते, पण तो DRS मध्ये नाबाद असल्याचे आढळून आले. त्यामुळे टीम पेनने आपली खदखद अशा पद्धतीने व्यक्त केल्याची चर्चा क्रिकेटवर्तुळात रंगली आहे.