भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दुसरा कसोटी सामना पर्थ येथील ऑप्टस या नव्या स्टेडियमवर सुरु आहे. या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेन याने नाणेफेक करून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. या दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने अतिशय संथ फलंदाजी केली. हा निर्णय पहिल्या सत्रात त्यांच्या फलंदाजांनी सार्थ ठरवला. पण त्यानंतर दिवसभराच्या खेळात भारताने चांगले पुनरागमन केले.

या सामन्याबद्दल आणि पर्थच्या खेळपट्टीबाबत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने एक ट्विट केले आहे. पर्थची खेळपट्टी ही नवीन आहे. या खेळपट्टीवर प्रथमच कसोटी सामना खेळवला जात आहे. त्यामुळे या खेळपट्टीचा दोनही संघांना तितकासा अनुभव नाही. अशा वेळी सचिनने या खेळपट्टीबाबत एक भाकीत केले आहे. ही खेळपट्टी वेगवान गोलंदाजांसाठी पोषक आहे. जसजसा सामना खेळला जाईल, तशी खेळपट्टी अधिक टणक होईल आणि त्यामुळे चेंडू अधिक उसळी घेईल आणि चेंडूचा वेग वाढण्यास मदत होईल, असे त्याने ट्विट केले आहे.

 

तसेच त्याने ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांचीदेखील स्तुती केली आहे.

 

दरम्यान, ऑप्टसच्या नव्या स्टेडियमवरील पहिल्यावहिल्या कसोटीला सामोरे जाताना भारतीय संघसुद्धा उत्साहात आहे. या मैदानावरील हिरवीगार जिवंत खेळपट्टी ही उत्साहवर्धक आहे, अशी प्रतिक्रिया भारताचा कर्णधार विराट कोहलीने व्यक्त केली होती.