ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क सध्या नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आहे. सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर शून्यावर बाद झाल्यामुळे नेटकऱ्यांनी स्टार्कला सोशल मीडियावर ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया एकदिवसीय मालिकेच्या तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघ २१० धावांवर असताना मार्नस लाबुशेन ६४ चेंडूत ५४ धावा करुन रविंद्र जडेजाच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर मिचेल स्टार्क पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरला होता.

मागे अॅलेक्स कॅरीसारखा आक्रमक फलंदाज असतानाही स्टार्क मैदानावर आलेला पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. परंतु त्याचे हावभाव पाहून नक्कीच तो काही झटपट धावा मिळवण्याच्या इराद्याने मैदानावर उतरल्याचे दिसत होते. आणि अपेक्षेप्रमाणे त्याने रविंद्र जडेजाच्या गोलंदाजीवर जोरदार फटका मारला आणि तो झेलबाद झाला. एकही धाव न करता शून्यावर बाद झाल्यामुळे नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

नेटकरी उडवत आहेत स्टार्कची खिल्ली

मुंबईत पहिल्या लढतीत ऑस्ट्रेलियाकडून मानहानीकारक पराभव पत्करल्यानंतर भारतीय संघाने कात टाकली आणि राजकोटच्या दुसऱ्या लढतीत शानदार विजयानिशी मालिकेत बरोबरी साधली. त्यामुळे तिसऱ्या लढतीद्वारे मालिकेवर वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या इराद्याने एकदिवसीय क्रिकेटमधील दोन तुल्यबळ संघ रविवारी बंगळुरुत खेळतील. दरम्यान, ऑस्ट्रेलियन कर्णधार फिंचने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलियाने अखेरच्या सामन्यात केन रिचर्डसनच्या जागी जोश हेजलवूडला संधी दिली आहे. भारतीय संघात मात्र कोणतेही बदल नाही.