अंतिम टी२० सामन्यात भारतीय संघाने यजमान ऑस्ट्रेलियावर ६ गडी राखून विजय मिळवला. या विजयामुळे भारताने ३ सामन्यांची मालिका १-१ अशी बरोबरीत सोडवली. या मालिकेतील दुसरा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. या मालिकेत लोकेश राहुलकडून अपेक्षा होत्या. पण त्याने फलंदाजीत संघाची निराशा केली. त्यामुळे कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात मुरली विजयबरोबर लोकेश राहुलच्या ऐवजी संघात पृथ्वी शॉ चा समावेश करण्यात यावा, असा सल्ला माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी दिला आहे.

६ डिसेंबरपासून भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होत आहे. स्टीव्हन स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर या अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्थितीत भारतीय संघाचे पारडे जड मानले जात आहे. या दरम्यान भारताच्या अंतिम संघात कोणाला संधी द्यायची? यावर खलबतं चालू असतानाच लोकेश राहुलऐवजी संघात मुंबईकर पृथ्वी शॉ याला संधी देण्यात यावी, असे मत गावसकर यांनी व्यक्त केले आहे.

पहिल्या कसोटी सामन्यात पृथ्वी शॉ यालाच संधी मिळाली पाहिजे. त्याने न्यूझीलंडमध्ये आपल्या खेळीची चमक दाखवली होती. तसेच विंडीजविरुद्ध घरच्या मैदानावरदेखील त्याने उतत, खेळ करून दाखवला होता. याउलट राहुलचा फॉर्म पाहता तो फलंदाजीत पृथ्वीपेक्षा सरस नाही, हे सांगता येऊ शकते. त्यामुळे पहिल्या कसोटीसाठी मुरली विजय आणि पृथ्वी शॉ हीच सलामीची जोडी असावी, असे गावसकर म्हणाले.