बांगलादेश विरूद्धच्या तिसऱ्या आणि अंतिम टी २० सामन्यात दीपक चहरने घेतलेल्या हॅटट्रिकच्या बळावर भारताने सामना जिंकला. श्रेयस अय्यर आणि के एल राहुल यांच्या दमदार अर्धशतकामुळे भारताने बांगलादेशपुढे १७५ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना दीपक चहरने ७ धावा देऊन ६ बळी टिपले आणि भारताला मालिका २-१ अशी जिंकवून दिली.

या सामन्यात युवा खेळाडू श्रेयस अय्यर याने धमाकेदार खेळी केली. त्याने ३३ चेंडूमध्ये ६२ धावा केल्या. श्रेयसने सामन्यात आपले पहिलेवहिले टी २० अर्धशतक झळकावले. यात ३ चौकार आणि ५ षटकारांचा समावेश होता. त्यातील ३ षटकार त्याने ३ सलग चेंडूंवर लगावले. अफिफ हुसेनने १५ व्या षटकाराच्या पहिल्या ३ चेंडूवर ३ षटकार खेचले.

पहा व्हिडीओ –

दरम्यान, भारताकडून कर्णधार रोहित शर्मा, शिखर धवन हे दोघे स्वस्तात परतल्यानंतर लोकेश राहुल आणि श्रेयस अय्यर यांनी डाव सावरला. राहुलने ७ चौकारांसह ३५ चेंडूत ५२ धावा केल्या. तर युवा श्रेयस अय्यरने ३३ चेंडूत ६२ धावा करत आपले पहिलेवहिले टी २० अर्धशतक झळकावले. मनीष पांडेनेही १३ चेंडूत २२ धावांची झंझावाती खेळी केली. त्यामुळे भारताने बांगलादेशपुढे १७५ धावांचे आव्हान ठेवले.

या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशने अत्यंत खराब खेळी केली. नईम आणि मिथून यांच्यात चांगली भागीदारी होत असताना मिथून २७ धावांवर बाद झाला. एकीकडे गडी बाद होत असताना धमाकेदार खेळी करणारा मोहम्मद नईमही मोक्याच्या वेळी ८१ धावांवर माघारी परतला. त्यामुळे बांगलादेशचा डाव १४४ धावांत आटोपला. दिपक चहरने एका हॅटट्रिक घेत ७ धावांत ६ बळी टिपले. त्याला सामनावीर घोषित करण्यात आले.