इंग्लंडविरोधातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात हार्दिक पांड्याला गोलंदाजी न देण्याचं कर्णधार विराट कोहलीने दिलेलं कारण ऐकून माजी खेळाडू विरेंद्र सेहवागने संताप व्यक्त केलं आहे. ३३७ इतकी आव्हानात्मक धावसंख्या उभारलेली असतानाही इंग्लंडने भारतीय संघाचा सहज पराभव केला. सहा गडी आणि ३९ चेंडू राखत इंग्लंडने भारताचा पराभव करत तीन सामन्यांच्या मालिकेत बरोबरी केली. इंग्लडंचे फलंदाज भारतीय गोलंदाजांची धुलाई करत असताना विराटने हार्दिक पांड्याला गोलंदाजी का दिली नाही यावरुन क्रिकेटप्रेमी संताप व्यक्त करत आहेत. त्यातच आता विरेंद्र सेहवागनेही हार्दिक पांड्यावर जास्त वर्कलोड नसल्याचं म्हटलं आहे.

बेन स्टोक्स आणि जॉनी बेअरस्टो यांनी भारतीय गोलंदाजांची जबरदस्त धुलाई केली. कृणाल पांड्या आणि कुलदीप यादव यांनी १६ ओव्हरमध्ये १५६ धाला दिल्या. त्यांना एकही विकेट घेता आली नाही. तर दुसरीकडे भुवनेश्वर कुमार आणि प्रसिध कृष्णा यांना मात्र यश मिळालं. पण इंग्लंडने जबरदस्त फलंदाजी केल्यामुळे त्यांनी विजयाला गवसणी घातली. विराट कोहलीला जेव्हा हार्दिक पांड्याला गोलंदाजी का देण्यात आली नाही असं विचारण्यात आलं तेव्हा त्याने त्याची बॉडी आणि वर्कलोड यांचं संतुलन राखणं गरजेचं असल्याचं सांगितलं.

Ind vs Eng : “जर हार्दिक पांड्या बॉलिंग करणार नसेल, तर टीम इंडियाला कठोर निर्णय घ्यावा लागेल”

विरेंद्र सेहवागने Cricbuzz बोलताना यावरुन स्पष्ट मत मांडत म्हटलं आहे की, “भारत पुढील काही महिने कोणतेही सामने खेळणार नसताना फक्त हार्दिक पांड्याचा वर्कलोड सांभाळण्यासाठी एकदिवसीय मालिक गमावणं योग्य नाही. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून हार्दिक पांड्याने चार ते पाच ओव्हर टाकणं अपेक्षित आहे”. सेहवागने यावेळी ५० ओव्हर्समुळे थकवा येतो हे मान्य केलं आहे. पण पाच ते सहा ओव्हर टाकल्याने जास्त काही फरक पडत नाही असंही सांगितलं आहे.

“भारत पुढील काही महिने कोणताही सामना किंवा मालिका खेळणार नाही आहे. आपल्याकडे फक्त आता आयपीएलच आहे. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का, की हार्दिक पांड्याचा वर्कलोड सांभाळण्यासाठी एकदिवसीय मालिकेत पराभव झाल्याने काही फरक पडत नाही. जर त्याच्या वर्कलोडमध्ये चार ते पाच ओव्हर समाविष्ट नसतील तर हे चुकीचं आहे. भारत प्रत्येक गोलंदाजाचा वर्कलोड सांभाळण्याचा प्रयत्न करत असून हार्दिकसाठी तोच नियम असल्याचं तो सांगण्याचा प्रयत्न करत आहे,” असं सेहवागने म्हटलं आहे.

“हार्दिक पांड्याने दुखापतीमधून बाहेर आल्यानंतर जास्त क्रिकेट खेळलेलं नाही. मला माहिती नाही हार्दिक पांड्याचा वर्कलोड खूप वाढला असल्याचं कोण ठरवत आहे. सर्जरी झाल्यापासून तो जास्त क्रिकेट खेळलेला नाही. कसोटीमध्ये तो नव्हता, टी-२० खेळला आणि तिथेही दोन तीन सामन्यात गोलंदाजी केली. याचा अर्थ त्याने काहीच लोड घेतलेला नाही. जर तो सतत आणि प्रत्येक फॉरमॅटमध्ये खेळत असेल तर मी समजू शकतो. पण त्याने सध्या तीन ते चार टी-२० सामन्यात चार-चार ओव्हर्स टाकल्या आहेत. कदाचित त्याने आयपीएलआधी कोणतीही दुखापत होऊ नये म्हणून सामन्यात गोलंदाजीपासून ब्रेक मागितला असल्याचीही शक्यता आहे,” असंही सेहवागने सांगितलं आहे.