रवि पत्की
ढगाळ वातावरण, सतत वाहणारा वारा आणि कागदी विमानाप्रमाणे अचानक दिशा बदलणारा ड्युक बॉल यामुळे इंग्लंडमधले कसोटी सामने गोलंदाजांचे लाडके नंदनवन नसतील तर नवल. वर्षभर 20-20 क्रिकेटमध्ये खा-खा मार खायचा आणि वर्षाखेर एक इंग्लंड दौरा करून यायचा आणि फलदाजांवर वर्षभराचा एकदाच सूड उगवून यायचा हा कार्यक्रम गोलंदाजांना क्रिकेटमधील इंटरेस्ट टिकवून ठेवायला चांगला ठरेल. खेळाडूच्या चेंडू आणि बॅटच्या कौशल्यापेक्षा वातावरणच सामन्याचे निकाल ठरवत असतील तर हा धोका कसोटी क्रिकेटला मारक ठरेल. कसोटीत फलंदाजांनी सहाशे धावा केल्या तर खेळपट्टी स्पोर्टिंग नव्हती असे म्हणले जाते तसेच  एकही संघ २५० धावा करू शकत नसेल तर गोलंदाजांना अवाजवी फायदा मिळतोय असं म्हणलं पाहिजे. सद्य परिस्थितीत  हवामान, खेळपट्ट्यावरील गवत, ड्युक चेंडू, भुसभुशीत खेळपट्ट्या अशा परिस्थितीत इंग्लंड, आफ्रिका, न्यूझीलंड, भारत या देशात कसोटी सामना फार तर साडेतीन दिवस चालतो. कशाला कसोटी करता पाच दिवस ठेवायचे? (भारतात स्पिनर्सचे आखाडे अडीच दिवसात मॅचचा खात्मा करतात)

इंग्लंडमध्ये वातावरणाचा इतका परिणाम होतो तर कसोटी सामने मेलबर्नप्रमाणे इन-डोर घ्यायची सोय करावी नाहीतर ड्युक चेंडू बदलावा. बरेच लोक यावर ‘वेगवेगळ्या कंडिशनमध्ये खेळता येत नसेल तर क्रिकेट खेळू नका असं म्हणतील’. पण अनेक समालोकच म्हणतायत की बर्मिंगहम आणि लॉर्डसला फलंदाजी करणे जवळपास अशक्य होते. कधी काही तास स्वछ सूर्यप्रकाश पडला तेव्हाच बॅटिंग सुसह्य झाली. ज्यांच्या वाट्याला सूर्य आला त्यांनी काही तास चैन अनुभवली. स्वछ प्रकाशाचा फायदा घेत लॉर्डसला शतक करणाऱ्या ख्रिस वोक्सचा काल ढगाळ हवेत बॅटला बॉल लागेना.

पहिल्या दोन्ही सामन्यात विपरीत परिस्थितीचा जास्तं तडाखा बसलेल्या भारतीय संघावर चालू ट्रेंटब्रिज कसोटीत काही काळ निसर्गाची कृपा झाली आणि त्याचा फायदा घेत कोहली-राहाणेने चांगली भागीदारी केली. ज्यांनी ती भागीदारी बघितली असेल त्यांना जाणवलं असेल की त्या तीन तासात चेंडूने बंडखोरी केली नाही. चेंडू  स्विंग झाला पण लेट नाही. कोहली आणि रहाणेने दिशा जज करून जिथे बॅट नेली तिथेच चेंडूने बॅटचा वेध घेतला आणि तो सुद्धा मधोमध. हिच भागीदारी या सामन्यात निर्णायक ठरणार आहे. इंग्लंडच्या फलंदाजीच्या वेळेस पुन्हा निसर्गाने रंग  बदलले. आपल्या नशिबाने पंड्या, इशांत आणि शमीने या वातावरणाचा चांगला फायदा उठवला. क्रिकेटमध्ये ‘किती’ या प्रश्नाइतकेच ‘कसे’ यालाही महत्व असते. पंड्याने पाच विकेट काढल्या. पण त्या अतिशय दर्जेदार चेंडूवर याला जास्तं महत्व आहे.

अगदी चांगले स्वछ हवामान राहिले तर इंग्लंड प्रतिकार करू शकतो ह्याचा विचार करून भारतीय संघ प्रिकॉशन म्हणून जास्तीत जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करेल. अन्यथा मॅच भारताने जिंकल्यात जमा आहे.