भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत २-१ असा विजय मिळवला आणि ऐतिहासिक ऑस्ट्रेलियाची सांगता केली. या दौऱ्यात भारतीय गोलंदाजांनी महत्वाची भूमिका बजावली. शेवटच्या एकदिवसीय सामन्यात तर फिरकीपटू युझवेन्द्र चहल याने ४२ धावा देत तब्बल ६ बळी टिपले आणि फलंदाजीला पोषक खेळपट्ट्यांवर गोलंदाजही कमाल करू शकतात हे दाखवून दिले. आता या गोलंदाजांची कसोटी असणार आहे ती न्यूझीलंडच्या मैदानांवर..

न्यूझीलंडची मैदाने ही तुलनेने छोटी असतात. त्यामुळे येथे गोलंदाजांची यथेच्छ धुलाई होते. पण याच न्यूझीलंडच्या भूमीवर भारताच्या एका गोलंदाजाने आपला ठसा उमटवला आहे. न्यूझीलंडविरुद्ध सर्वाधिक बळी घेण्याचा विक्रम जवागल श्रीनाथ याच्या नावे आहे.

१९९२ ते २००३ या कालावधीत भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्ध एकूण १८ एकदिवसीय सामने खेळले. यामध्ये श्रीनाथने तब्बल ३८ बळी टिपले आहेत. कोणत्याही भारतीय गोलंदाजांची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. श्रीनाथ पाठोपाठ अनिल कुंबळे आणि झहीर खान यांनी न्यूझीलंडच्या भूमीत १४ बळी टिपले आहेत. सध्याच्या टीम इंडियाच्या गोलंदाजांपैकी मोहम्मद शमीच्या नावे ११ बळी आहेत. त्यामुळे या मालिकेत कुंबळे आणि झहीरला मागे टाकण्याची संधी आहे.