विशाखापट्टणम कसोटीत दोन्ही डावांमध्ये शतकं झळकावल्यानंतर सलामीवीर रोहित शर्माने रांची कसोटीत पहिल्या डावात द्विशतकी खेळी केली. आफ्रिकन गोलंदाजांचा समाचार घेताना रोहित शर्माने २५५ चेंडूत २१२ धावा केल्या. त्याच्या या खेळीत २८ चौकार आणि ६ षटकारांचा समावेश होता. या खेळीदरम्यान रोहितने अनेक विक्रम मोडले. दुसऱ्या दिवशी खेळ संपल्यानंतर रोहितने पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्याच्या कामगिरीवरुन प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराची रोहितने फिरकी घेतली.

“या संधीचा मी जर लाभ घेतला नसता तर बऱ्याच गोष्टी होऊ शकल्या असत्या. तुम्ही लोकं माझ्याबद्दल बरंच काही लिहीलं असतंत. आता तुम्ही चांगलं लिहाल माझ्याबद्दल…” रोहित शर्माने दिलेल्या या उत्तराला सर्वांनी दाद दिली.

विशाखापट्टणम कसोटीत रोहितने १७६ आणि १२७ धावा केल्या होत्या. ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाने २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. तिसऱ्या सामन्यातही भारतीय संघ विजयाच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे. त्यामुळे आफ्रिकेचे फलंदाज भारतीय गोलंदाजांचा कसा सामना करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.