सलामीवीर रोहित शर्माने तिसऱ्या कसोटी सामन्यात शतकी खेळी करत भारताचा डाव सावरला. रोहितने अजिंक्य रहाणेच्या साथीने आफ्रिकन गोलंदाजांचा समाचार घेत शतक झळकावलं. दोन्ही फलंदाजांनी पहिल्या दिवशी शतकी भागीदारी केली. पाऊस आणि अंधुक प्रकाशामुळे पहिल्या दिवसाचा खेळ थांबला त्यावेळी रोहित शर्मा नाबाद ११७ तर अजिंक्य रहाणे ८३ धावांवर खेळत होता. रोहितच्या या खेळाचं फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांनी कौतुक केलं आहे.

रोहित शर्मा आक्रमक खेळाडू आहे, तो कसोटी क्रिकेटमध्येही चांगली कामगिरी करेल हा मला विश्वास होता. त्याला सलामीला पाठवण्याचा आमचा निर्णय योग्यच होता हे आता सिद्ध झालंय. त्याने या मालिकेत ज्या पद्धतीने धावा काढल्या आहेत, त्यामुळे कसोटी क्रिकेटमध्ये सलामीचा प्रश्न काहीकाळासाठी निकाली निघाला आहे, राठोड यांनी पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला.

“रोहित जर त्याच्या नेहमीच्या फॉर्मात असेल तर तो कोणत्याही मैदानावर भारतासाठी चांगल्या धावा जमवू शकतो. माझ्या मते त्याला कसोटी क्रिकेटमध्ये खेळताना आपल्या शैलीत फारसे बदल करावे लागले नसणार. माझ्या मते रोहितने फक्त आपल्या रणनितीमध्ये थोडासा बदल केला असेल”, विक्रम राठोड रोहितच्या फलंदाजीचं कौतुक करत होते. दरम्यान ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताने २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे, त्यामुळे अखेरच्या कसोटी सामन्यात भारतीय संघ कसा खेळ करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.