आफ्रिकन गोलंदाजांचा यथेच्छ समाचार घेत भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधलं आपलं पहिलं द्विशतक झळकावलं आहे. रांचीच्या मैदानावर रोहितने मैदानात चौफेर फटकेबाजी करत आपल्या शतकी खेळीचं द्विशतकी खेळीत रुपांतर केलं. महत्वाची गोष्ट म्हणजे या सामन्यात रोहितने आपलं शतक आणि द्विशतक हे षटकाराच्या सहाय्याने पूर्ण केलं.

रोहितने ९५ धावांवर असताना पिडीटच्या गोलंदाजीवर षटकार खेचत शतक झळकावलं. तर दुसऱ्या दिवशी उपहाराच्या सत्रानंतर एन्गिडीच्या गोलंदाजीवर षटकार खेचत आपलं पहिलं द्विशतक झळकावलं. या खेळीने एक अनोखा योगायोग साधला गेला आहे. कसोटी मालिकेत भारतीय फलंदाजाकडून झळकावलेलं हे तिसरं द्विशतक ठरलं आहे. एका कसोटी मालिकेत भारताच्या ३ फलंदाजांनी द्विशतक झळकावण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे.

मात्र रोहित शर्माचा हा आनंद फारकाळ टिकू शकला नाही. २१२ धावांवर असताना रोहित कगिसो रबाडाच्या गोलंदाजीवर उंच फटका खेळण्याच्या प्रयत्नात सीमारेषेवर एन्गिडीकडे झेल देत माघारी परतला. आपल्या द्विशतकी खेळीत रोहितने २८ चौकार आणि ६ षटकार खेचले.