भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातला पहिला टी-२० सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. गुवाहटीच्या मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या सामन्यात, भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र सामना सुरु होण्याआधीच पाऊसाला सुरुवात झाल्यामुळे सर्वांचा हिरमोड झाला. काहीवेळांनी पाऊस थांबला मात्र खेळपट्टीचा काही भोग ओलसर राहिल्यामुळे सामना रद्द करण्यात आला.

अवश्य वाचा – बूँद से गई…पाऊस नव्हे तर ‘या’ क्षुल्लक चुकीमुळे रद्द झाला सामना !

या मालिकेतला दुसरा सामना मंगळवारी इंदूरच्या होळकर मैदानावर खेळवण्यात येईल. नवीन वर्षात भारतीय संघ आपल्या पहिल्या विजयासाठी उत्सुक आहे. मात्र दुसऱ्या टी-२० सामन्यातही पावसाने हजेरी लावली तर?? असा प्रश्न अनेक चाहत्यांच्या मनात आहे. मात्र प्रत्यक्षात इंदूरमध्ये मंगळवारी पाऊस पडण्याची कोणतीही शक्यता नाहीये.

Accuweather या खासगी हवामान संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, दुपारपर्यंत इंदूरचं तापमानं २६ अंश सेल्सिअसपर्यंत राहिल…तर रात्री हे तापमान १५ अंशापर्यंत घसरण्याची शक्यता आहे. मात्र इंदूरमध्ये मंगळवारी पाऊस पडण्याची कोणतीही शक्यता नाही. गुवाहटीच्या मैदानात सामना पाहण्यासाठी आलेल्या सुमारे ५० हजाराहून अधिक चाहत्यांचा हिरमोड झाला होता. त्यामुळे इंदूरच्या मैदानात दोन्ही संघ कसा खेळ करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.