भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान कर्णधार विराट कोहली आणि मयांक अग्रवालच्या अर्धशतकी खेळाच्या जोरावर भारताने 5 बाद 264 धावांची मजल मारली आहे. विंडीजचा कर्णधार जेसन होल्डरने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. भारताचे सलामीवीर लोकेश राहुल व मयांक यांनी सावध सुरुवात केल्यानंतर होल्डरने विंडीजला पहिले यश मिळवून दिले. त्याने राहुलला 13 धावांवर स्लीपमध्ये उभ्या असलेल्या भारदस्त शरीरयष्टीच्या पदार्पणवीर रकहीम कोर्नवॉलकडे झेल देण्यास भाग पाडले.

त्यानंतर कोर्नवॉलने त्याच्या तिसऱ्याच षटकात भरवशाच्या चेतेश्वर पुजाराला अवघ्या ६ धावांवर बाद करून कारकीर्दीतील पहिला बळी मिळवला. 46 धावांवर दोन फलंदाज माघारी परतल्यावर कर्णधार विराट कोहली व मयांक यांनी किल्ला सांभाळला. उपहारानंतर मयांकने केमार रोचला चौकार लगावून कसोटी कारकीर्दीतील तिसरे अर्धशतक झळकावले. कर्णधार विराट कोहलीने सर्वाधिक 76 धावा केल्या. तर मयांक अग्रवालनेही 127 चेंडूंमध्ये 55 धावांची खेळी करत भारताचा डाव सांभाळला. मागील सामन्यात उत्तम कामगिरी केलेल्या अजिंक्य रहाणेला या सामन्यात केवळ 24 धावा करता आल्या. दिवस अखेरीस भारताने 5 बाद 264 धावा केल्या. सध्या हनुमा विहारी (42) तर ऋषभ पंत (27) धावांवर खेळत आहेत.

वेस्ट इंडिजकडून कर्णधार जेसन होल्डरने सर्वाधिक तीन गडी बाद केले. त्याने लोकेश राहुल, मयांक अग्रवाल आणि विराट कोहलीला माघारी धाडले. दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. तर वेस्ट इंडिजच्या संघात दोन बदल करण्यात आले आहेत. 143 किलो वजनी आणि 6 फुट 5 इंच उंचीच्या रहकीम कॉर्नवाल याने कसोटी सामन्यात पदार्पण केले. तर जहमार हॅमिल्टन यालाही संघात स्थान देण्यात आले आहे.

पहिल्यांदा फलंदाजीत यश
कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाचा कसोटी सामन्यात पहिल्यांदा फलंदाजीचा रकॉर्ड उत्तम राहिला आहे. त्याच्या नेतृत्वाखाली खेळलेल्या 28 सामन्यांपैकी 22 सामन्यांमध्ये भारतीय संघाला विजय मिळाला आहे. तर 4 सामने ड्रॉ झाले आहे. तर 2018 मध्ये इंग्लंडविरोधात भारतीय संघाला एकमात्र पराभव स्वीकारावा लागला होता. कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ 48 वा कसोटी सामना खेळत आहे. या सामन्यात भारतीय संघाला विजय मिळाल्यास सर्वाधिक कसोटी सामने जिंकणाऱ्या भारतीय कर्णधाराच्या यादीत कोहलीचे नाव समाविष्ट होईल. सध्या हा विक्रम महेंद्रसिंग धोनीच्या नावावर आहे.