टीम इंडियाने कर्णधार विराट कोहलीचे नाबाद शतक आणि मुंबईकर श्रेयस अय्यरच्या दमदार खेळीच्या जोरावर अखेरच्या एकदिवसीय सामन्यात ६ गडी राखून विजय मिळवला. मालिकेतला पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. त्यामुळे या विजयासह भारताने ३ एकदिवसीय सामन्यांची मालिका २-० अशी जिंकली.

टीम इंडियाने या मालिका विजयासह एक दमदार पराक्रम करून दाखवला. भारताचा हा विंडिजविरूद्धचा सलग नववा मालिका विजय ठरला.  भारताने २००७ साली जानेवारी महिन्यात विंडिजविरूद्ध एकदिवसीय मालिका जिंकली. त्यानंतर आतापर्यंत भारताने विंडिजविरूद्ध एकही एकदिवसीय मालिका गमावलेली नाही. तसेच, परदेशातही हा भारताचा सलग तिसरा एकदिवसीय मालिका विजय ठरला.

दरम्यान, विडिजला २४० धावांत रोखल्यानंतर डकवर्थ लुईस नियमानुसार भारताला विजयासाठी २५५ धावांचं आव्हान देण्यात आलं. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरूवात खराब झाली. रोहित शर्मा आणि शिखर धवन स्वस्तात बाद झाले. ऋषभ पंतही १ धावेवर माघारी परतला. त्यानंतर मुंबईकर श्रेयस अय्यरने विराटच्या साथीने शतकी (१२०) भागीदारी रचत भारताच्या डावाला आकार दिला. श्रेयस अय्यर ६५ धावांवर माघारी परतला. तर कर्णधार विराट कोहलीने केदार जाधवच्या साथीने आपल्या ४३ व्या शतकाची नोंद केली आणि सामन्यात विजय मिळवला.

त्याआधी, पावसाने व्यत्यय आणलेल्या अखेरच्या एकदिवसीय सामन्यात विंडीजने २४० धावांपर्यंत मजल मारली. सलामीवीर ख्रिस गेल आणि एविन लुईसने शतकी भागीदारी करत विंडीजला आश्वासक सुरुवात करुन दिली. यानंतर पावसाने सामन्यात हजेरी लावल्यामुळे बराच वेळ वाया गेला. पाऊस थांबल्यानंतर अखेरीस १५ षटकांचा खेळ कमी करण्यात आला. सलामीवीर ख्रिस गेल आणि एविन लुईस यांनी पहिल्या विकेटसाठी ११५ धावांची भागीदारी केली. पण शिमरॉन हेटमायर, शाय होप यांना ठराविक अंतराने भारतीय गोलंदाजांनी माघारी धाडलं. यानंतर निकोलस पूरन आणि जेसन होल्डरने फटकेबाजी करत संघाला २०० धावांचा टप्पा ओलांडून दिला. मात्र ते देखील आपल्या संघाला मोठा टप्पा गाठून देऊ शकले नाहीत. भारताकडून खलील अहमदने ३ बळी घेतले.