भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील दुसऱ्या आणि महत्त्वपूर्ण सामन्यात रोहित शर्माने कर्णधाराला साजेशी खेळी केली. रोहितने कारकिर्दीतील तिसरे द्विशतक झळकावले. या सामन्यात रोहितने सुरुवातीला संयमी खेळी केली. मॅथ्यूजच्या पहिल्या षटकात त्याने एकही धाव घेतली नाही. मात्र, त्यानंतर त्याने मैदानात दमदार खेळ दाखवला. या सामन्यात रोहितने १५३ चेंडुत १३ चौकार आणि १२ षटकारांच्या मदतीनं नाबाद २०८ धावांचीखेळी केली. वनडेमध्ये तिसरे द्विशतक झळकवणारा रोहित पहिला फलंदाज आहे.

रोहित शर्माने २६४ धावा करत वनडेतील दुसरे द्विशतक देखील श्रीलंकेविरुद्धच झळकावले होते. श्रीलंकेविरुद्धची ही खेळी रोहितच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील सर्वोच्च खेळी आहे. या सामन्यात रोहित शर्मा अवघ्या ४ धावांवर खेळत असताना थिसारा परेराने त्याला जीवनदान दिले होते. त्यानंतर रोहितने मागे वळून पाहिले नाही. रोहितने ऑस्ट्रेलियाविरुद्ध २०९ धावांची खेळी करत पहिले द्वशतक साजरे केले होते.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या मैदानात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने २०१० मध्ये वनडेतील पहिलं वहिलं द्विशतक झळकावले, त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नाबाद २०० धावांची खेळी केली होती. त्यानंतर २०१३ मध्ये रोहित शर्माने कांगारुंविरुद्ध कारकिर्दीतील पहिलं द्विशतक झळकावले. तर वेस्ट इंडिजचा धमाकेदार फलंदाज ख्रिस गेलने झिम्बाब्वेविरुद्ध २१५ धावांची खेळी केली असून, न्यूझीलंडच्या मार्टिन गप्तिलने वेस्ट इंडिजविरुद्ध २३७ धावांची नाबाद खेळी करत द्विशतक ठोकणाऱ्या फलंदाजांच्या यादीत स्थान मिळवले होते. भारताचा धमाकेदार फलंदाज वीरेंद्र सेहवागने वेस्ट इंडिजविरुद्ध २१९ धावांची तुफानी खेळी केली होती.