राज्य सरकार पाठीशी असल्याचा डीडीसीएचे अध्यक्ष बन्सल यांचा दावा
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा कसोटी सामना दिल्लीच्या फिरोज शाह कोटला स्टेडियमवरच होईल, असा विश्वास दिल्ली जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे (डीडीसीए) अध्यक्ष स्नेह प्रकाश बन्सल यांनी व्यक्त केला. तसेच राज्य सरकार आमच्या पाठीशी असल्याचा दावाही त्यांनी केला. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) दिलेल्या अंतिम मुदतीपूर्वी स्टेडियमचे काम पूर्ण करू, असे मत बन्सल यांनी व्यक्त केले.
भारताचे माजी कसोटीपटू बिशन सिंग बेदी यांनी दिल्लीच्या काही माजी क्रिकेटपटूंसह डीडीसीएमधील भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी, याकरिता मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली होती. त्या भेटीत बेदींनी भ्रष्टाचाराच्या मुद्दय़ासह भारत व दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्याचे आयोजन करण्यात डीडीसीए असमर्थ असल्याचेही सांगितले होते. बेदींच्या या भूमिकेवर बन्सल यांनी टीका केली आहे. बेदी आणि त्यांचे सहकारी केजरीवाल यांच्यासमोर चुकीचे चित्र उभे करून पाहत असल्याचा आरोप त्यांनी केला.
केजरीवाल यांनी डीडीसीएतील भ्रष्टाचार प्रकरणाच्या चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती नेमली आहे आणि १५ नोव्हेंबपर्यंत त्याचा अहवाल अपेक्षित आहे. यावर बन्सल म्हणाले, ‘‘बेदींबद्दल मला नितांत आदर आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात मला काही बोलायचे नाही, परंतु ते मुख्यमंत्र्यांसमोर चुकीचे चित्र उभे करत आहेत. आमच्या अधिकाऱ्यांनी केजरीवाल यांनी नियुक्त केलेल्या समितीच्या सदस्यांची भेट
घेतली आहे. मी सर्वाना खात्री देऊ इच्छितो की सरकार आमच्या पाठीशी आहे.’’
या बंडाळीच्या पाश्र्वभूमीवर बीसीसीआयनेही कडक पाऊल उचलत चौथ्या कसोटीसाठी पुणे शहराचा पर्याय ठेवल्याने आणि राज्य सरकारने डीडीसीएला २४.४५ कोटी रुपयांचा मनोरंजक कर भरण्यास सांगितल्यामुळे डीडीसीएच्या चिंतेत भर पडली आहे.
‘‘अशा प्रकारच्या घटना गेल्या पाच वर्षांपासून सुरू आहेत. आम्ही एकत्र येऊन काम करत आहोत आणि अंतिम मुदतीपूर्वी हातचे काम पूर्ण होईल,’’ असे बन्सल म्हणाले.