विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ऑस्ट्रेलियात कसोटी आणि वन-डे मालिकेत विजय मिळवत ऐतिहासीक कामगिरीची नोंद केली. या कामगिरीनंतर सर्वच स्तरातून भारतीय संघावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. 2016 सालपासून भारतीय संघ कसोटी क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियाचे माजी खेळाडू आणि समालोचक डीन जोन्स यांनी भारतीय संघाच्या कामगिरीचं कौतुक केलं असून 80 च्या दशकात विंडीजच्या संघाप्रमाणे भारतीय संघ आपला दरारा निर्माण करण्यात यशस्वी झालाय असंही म्हटलं आहे.

अवश्य वाचा – ऑस्ट्रेलिया दौरा गाजवणाऱ्या चेतेश्वर पुजाराच्या मनात एका गोष्टीची खंत कायम

“80 च्या दशकात विंडीजच्या संघाने जागतिक क्रिकेटमध्ये आपला दरारा निर्माण केला होता. भारतीय संघाही सध्या अशाच पद्धतीने खेळतोय. कोणत्याही देशात गेलो तरीही आम्ही सामना जिंकू शकतो हे चित्र भारताला कायम ठेवावं लागणार आहे. विंडीजने या बाबतीत आपली भिती इतर संघाच्या मनात निर्माण केली होती, भारतही यामध्ये यशस्वी झालाय.” टाइम्स ऑफ इंडिया वृत्तपत्रात लिहीलेल्या आपल्या कॉलममध्ये डीन जोन्स यांनी भारतीय संघाच्या कामगिरीचं कौतुक केलं.

कसोटी मालिकेत चेतेश्वर पुजाराने फलंदाजीमध्ये आपलं नाणं खणखणीत वाजवून दाखवलं. याचसोबत गोलंदाजांनीही दोन्ही डावांमध्ये ऑस्ट्रेलियन फलंदाजांना बाद करुन, आपला फॉर्मही दाखवून दिला. ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर भारत न्यूझीलंडमध्ये दाखल झाला असून, 23 जानेवारीपासून दोन्ही संघामध्ये 5 सामन्यांची वन-डे मालिका सुरु होणार आहे. न्यूझीलंडमध्ये भारतीय संघाच्या कामगिरीचा इतिहास फारसा चांगला नाही, त्यामुळे या मालिकेत भारतीय संघ कसा खेळ करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

अवश्य वाचा – वन-डे क्रिकेटमध्ये अजुनही धोनीच सर्वोत्तम फिनीशर !