कबड्डी वर्ल्डकपमध्ये यजमान भारताने बांगलादेशवर ५७ – २० गुणांनी विजय मिळवला आहे. भारताने बांगलादेशला चार वेळा ऑल आऊट बाद करत दिमाखदार विजय मिळवला. या विजयासह भारताने वर्ल्डकपच्या सेमी फायनलमधील प्रवेश जवळपास निश्चित केला आहे.

कबड्डी वर्ल्डकपच्या अ गटात मंगळवारी भारताचा सामना बांगलादेशशी होता. कोरियाने सलामीच्याच लढतीत आश्चर्याचा धक्का दिल्यामुळे भारताला आपणसुद्धा हरवू शकतो, असा बांगलादेशचा विश्वास दुणावला होता. पण भारताच्या कबड्डीपटूंनी बांगलादेशचे मनसुबे उधळून लावले. भारताने बांगलादेशला तब्बल चार वेळा ऑल आऊट केले. अजय ठाकूर आणि परदीप नरवाल हे दोघे भारताच्या विजयाचे शिल्पकार ठरले. भारताने बांगलादेशवर तब्बल ३७ गुणांच्या फरकाने विजय मिळवला. बचाव आणि आघाडीच्या फळीने अनुभवाला साजेसी कामगिरी करत  भारताला दमदार विजय मिळवून दिला. या विजयासह भारताने ११ गुणांसह अव्वल स्थानी झेप घेतली आहे.  भारताने तीन सामन्यांपैकी दोन सामन्यात विजय मिळवला आहे. तर दक्षिण कोरियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता. ‘कोरियाविरुद्ध पराभव झाल्याने आजचा सामना आमच्यासाठी महत्त्वाचा होता आणि त्यानुसारच आम्ही खेळ केला’ अशी प्रतिक्रिया अजय ठाकूरने सामन्यानंतर दिली आहे.

बांगलादेशविरुद्ध विजयाची मालिका सुरूच

कबड्डी वर्ल्डकपमध्ये भारताची बांगलादेशविरुद्ध विजयाची मालिका सुरुच आहे. २००४मध्ये झालेल्या पहिल्या विश्वचषकात भारताने उपांत्य फेरीत बांगलादेशवर ३९-१९ असा विजय मिळवला होता, तर २००७च्या दुसऱ्या विश्वचषकातील उपांत्य फेरीत भारताने ४८-२२ असा विजय प्राप्त केला होता. याशिवाय आशियाई क्रीडा स्पध्रेच्या अंतिम फेरीत १९९०, १९९४ आणि २००२ असे तीनदा बांगलादेशचा संघ भारताविरुद्ध हरला होता.