भारतीय पुरुष हॉकी संघाने विश्व हॉकी लीगच्या अंतिम फेरीत जर्मनीला पराभूत करत कांस्यपदकाची कमाई केली. कलिंगा स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात भारताने जर्मनीला २-० असे पराभूत केले. या सामन्यात गोल किपर सुरज करकेरा याने लक्षवेधी कामगिरी केली. खेळाच्या सुरुवातीला जर्मनीला दोनवेळा गोल करण्याची संधी मिळाली. मात्र, गोलकिपर सुरजने उत्कृष्ट बचाव करत जर्मनीच्या मनसुब्यावर पाणी फेरले. खेळाच्या १४ व्या मिनिटात जर्मनीने पेनल्टीची संधी गमावली.

२१ व्या मिनिटाला आकाश दीपने दिलेल्या पासवर एस व्ही. सुनीलने अप्रतिम गोल करत भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर ३६ व्या मिनिटाला जर्मनीच्या मार्कने गोल नोंदवत सामना १-१ असा बरोबरीत आणला. सामना बरोबरीत असताना ५१ व्या मिनिटाला भारताला पॅनल्टीची संधी मिळाली. या संधीचं सोनं करत हरमनप्रीतनं भारताला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. आघाडी कायम राखत भारताने हा सामना २-१ असा जिंकला. घरच्या मैदानावर जागतिक हॉकी लीगमध्ये अंतिम फेरी गाठण्याचे भारताचे स्वप्न शुक्रवारी भंगले होते. गोन्झालो पिलेटने नोंदवलेल्या गोलमुळेच रिओ ऑलिम्पिक विजेत्या अर्जेटिनाने त्यांच्यावर १-० अशी मात केली होती. त्यानंतर कांस्य पदकाच्या शर्यत भारताने दिमाखात जिंकली.