डार्विन, ऑस्ट्रेलिया येथे सुरू असलेल्या १९ वर्षांखालील तिरंगी क्रिकेट मालिकेत जबरदस्त फॉर्मात असलेल्या भारताच्या संघाने न्यूझीलंडचा ७ विकेट्सनी धुव्वा उडवला. अंतिम फेरीत याआधीच स्थान पटकावलेल्या भारतीय संघाचा स्पर्धेतला हा सलग चौथा विजय आहे. १२ जुलैला होणाऱ्या अंतिम लढतीत भारतीय संघाचा ऑस्ट्रेलियाशी मुकाबला आहे.  भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारतीय संघाने न्यूझीलंडचा डाव अवघ्या ११९ धावांत गुंडाळला. दीपक हुडाने २६ धावांत ३ बळी पटकावले. आमिर गनीने १५ धावांत २ बळी टिपले. न्यूझीलंडतर्फे कायले जेमिइसनने सर्वाधिक ३४ धावांची खेळी केली.  कर्णधार विजय झोलच्या नाबाद ४६ धावांच्या खेळीच्या जोरावर भारतीय संघाने ७ विकेट्स राखून हे लक्ष्य गाठले. विजयने ६ चौकार आणि एका षटकारासह नाबाद ४६ धावा केल्या. अखिल हेरवाडकरने २५, तर संजू सॅमसनने २३ धावा करीत विजयला चांगली साथ दिली.