भारतीय संघाने बुद्धिबळ ऑलिम्पियाडमधील तिसऱ्या फेरीत दोन्ही गटांत बरोबरी स्वीकारली. पुरुष गटात इटलीने २-२ असे तर महिलांमध्ये कझाकिस्तानने भारताला २-२ असे बरोबरीत रोखले. पुरुष गटांत भारताकडून एस.पी.सेतुरामन याने अल्बर्ट डेव्हिड याच्यावर मात केली. इटलीविरुद्ध भारताला मिळालेला हा एकमेव विजय होता. परिमार्जन नेगी या भारतीय खेळाडूला फॅबियानो कारुआना याच्याकडून पराभव पत्करावा लागला. भारताच्या कृष्णन शशिकिरण याने डॅडिनयल व्होकाटुरो याला बरोबरीत रोखले, तर बी. अधिबन याने सॅबियानो ब्रुनेल्लो याच्याविरुद्धचा डाव बरोबरीत ठेवला.  
महिलांमध्ये भारताच्या पद्मिनी राऊत हिने पराभवाच्या छायेतून कझाकिस्तानच्या मॅदिना डॅव्हेलबेयेव्हा हिच्यावर शानदार विजय मिळविला. त्याआधी भारताच्या ईशा करवडे हिला झानसाया अब्दुमलिक हिच्याकडून पराभवाला सामोरे जावे लागले. द्रोणावली हरिका या भारतीय खेळाडूने गुलिक्शन नाखबेयेव्हा हिला बरोबरीत रोखले तर तानिया सचदेव हिने दिनारा सादौकासोव्हा हिच्याविरुद्ध बरोबरी स्वीकारली.
या स्पर्धेत १७१ देशांनी भाग घेतला आहे. पुरुष विभागात फ्रान्स, रशिया, चीन, अझरबैजान, इस्रायल, चेक प्रजासत्ताक, बल्गेरिया, उझबेकिस्तान, रुमानिया यांनी प्रत्येकी सहा गुणांसह संयुक्त आघाडी घेतली आहे. भारतीय संघ १२व्या स्थानावर आहे. महिलांमध्ये इराण, स्लोव्हाकिया, चीन, अझरबैजान, इंडोनेशिया, अर्मेनिया, जर्मनी, रशिया, नेदरलँड्स, जॉर्जिया, हंगेरी, क्युबा यांनी प्रत्येकी सहा गुणांसह संयुक्त आघाडी स्थान मिळविले आहे. या गटात भारत १३व्या स्थानावर आहे.
पुरुष गटात तीन वेळा विजेतेपद मिळविणाऱ्या अर्मेनियाला फ्रान्सने २.५-१.५ असे हरविले. नेदरलँड्सने अमेरिकेवर शानदार विजय मिळविला. रशियाने मॅसेडोनिया संघाचा ४-० असा धुव्वा उडविला. चौथ्या फेरीत भारताच्या पुरुष संघाला क्युबाचे आव्हान आहे तर महिलांना सर्बियाशी खेळावे लागणार आहे.