३० मे पासून इंग्लंडमध्ये सुरु होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेसाठी भारताने आपल्या संघाची घोषणा केली आहे. १५ सदस्यीय संघात, निवड समितीने यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनीला पर्याय म्हणून दिनेश कार्तिकची निवड केली आहे. तर चौथ्या क्रमांकासाठी अंबाती रायुडूला वगळून विजय शंकरला संघात संधी दिली आहे. भारताचा हा संघ संतुलित असल्याचं विधान, माजी क्रिकेटपटू राहुल द्रविडने केलं आहे.

“विश्वचषकासाठी भारताचा संघ हा अतिशय चांगला आणि संतुलित आहे. सध्याच्या संघात भरपूर पर्याय उपलब्ध आहेत. एखाद्या दुसऱ्या नावाबद्दल मतमतांतर असू शकतात. त्यामुळे आता स्पर्धेत संघ कशी कामगिरी करतो हे पाहणं महत्वाचं आहे. संघाची निवड आता झाली आहे, त्यामुळे स्पर्धेत चांगली कामगिरी करणं हा एकमेव पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहे.” टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत द्रविड बोलत होता.

अवश्य वाचा – भारत विश्वचषकाच्या उपांत्य फेरीपर्यंत नक्की पोहचेल !

“विश्वचषकाआधी घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाने भारताला टी-२० आणि वन-डे मालिकेत पराभवाचं पाणी पाजलं होतं. मात्र, गेल्या वर्षभरात भारतीय संघ चांगला खेळ करतो आहे. आपला संघ चांगला आहे, त्यामुळे विश्वचषक स्पर्धा जिंकली तर तुम्ही घरच्या मैदानावर मालिका हरलात की नाही हे फारसं महत्वाचं ठरणार नाही.” द्रविडने भारतीय संघाला विश्वचषकासाठी शुभेच्छा दिल्या. त्यामुळे या स्पर्धेत भारतीय संघाची कशी कामगिरी होतेय, याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.