|| मिलिंद ढमढेरे

अ‍ॅथलेटिक्स हा ऑलिम्पिक, आशियाई व राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धामध्ये पदकांची लयलूट करण्यासाठी असलेला हुकमी क्रीडा प्रकार मानला जातो. आजपर्यंत भारताला ऑलिम्पिकमध्ये अ‍ॅथलेटिक्समध्ये (नॉर्मन प्रिटचर्डचा अपवाद वगळता) पदकांवर नाव कोरता आलेले नाही. जकार्ता येथे नुकत्याच झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी अ‍ॅथलेटिक्समध्ये सात सुवर्ण, दहा रौप्य व दोन कांस्य अशी तब्बल एकोणीस पदके जिंकून कौतुकास्पद कामगिरी केली आहे. आणखी दोन वर्षांनी होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेतील भावी यशाची ही नांदीच असणार आहे.

नवी दिल्ली येथे १९५१ मध्ये झालेल्या पहिल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने दहा सुवर्ण, १२ रौप्य व १२ कांस्य अशी एकूण ३४ पदकांची कमाई केली होती. त्यानंतर भारतीय खेळाडूंनी पुन्हा १९८२ मध्ये घरच्या मैदानावर झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत चार सुवर्णपदकांसह २१ पदके जिंकली होती. त्याआधी १९७८ मध्ये त्यांना जरी आठ सुवर्णपदके मिळाली असली तरी त्या वेळी एकूण अठराच पदके त्यांनी जिंकली होती. २०१४ मध्ये भारताला केवळ दोनच सुवर्णपदके मिळाली होती. या पाश्र्वभूमीवर यंदाचे यश खरोखरीच प्रशंसनीय आहे.

भारतीय संघातील खेळाडूंची निवड करताना ठेवण्यात आलेली पारदर्शकता, युवा खेळाडूंना अधिकाधिक प्राधान्य, संघ निवडीबाबत कोणताही राजकीय दबाब नाही, योग्य व अव्वल दर्जाचे प्रशिक्षण, यांबरोबरच खेळाडूंनी दाखविलेली सकारात्मक विजिगीषूवृत्ती यामुळेच भारताला घवघवीत कामगिरी करता आली. त्याचबरोबर शासकीय व बिगरशासकीय संस्थांनी खेळाडूंना केलेली थेट आर्थिक मदत हा देखील महत्त्वाचा भाग होता.

बहुतांश भारतीय पदक विजेते खेळाडू ग्रामीण भागातून तयार झाले आहेत. कितीही कष्ट झाले तरी चालतील पण पदक मिळवीत आर्थिक स्थैर्यता मिळविणे, हे ध्येय डोळ्यासमोर ठेवीतच या खेळाडूंनी करिअर केले आहे. स्वप्ना बर्मन हिने देशास हेप्टॅथलॉनमधील पहिले सोनेरी यश मिळवून दिले. तिचे वडील सायकलरिक्षा चालविण्याचा व्यवसाय करतात. बरेच दिवस ते अंथरुणाला खिळलेले आहेत. त्यातच स्वप्नाच्या दोन्ही पायांना प्रत्येकी सहा बोटे असल्यामुळे हेप्टॅथलॉनसाठी तिला वेगळे बूट आवश्यक होते. पण विशिष्ट बूट उपलब्ध नव्हते. त्या परिस्थितीत साधे बूट घालूनच तिने ही स्पर्धा केली. ही स्पर्धा सुरू असतानाच तिला दाढेच्या दुखण्याचाही त्रास होत होता. अशा प्रतिकूल स्थितीत तिने कमालीची जिद्द व चिकाटी दाखवीत सोनेरी कामगिरी केली.

स्वप्नाप्रमाणेच हिमा दास हिचे यशही अतुलनीय आहे. आसाममधील आदिवासी भागात राहणाऱ्या या खेळाडूने सर्वाचे लक्ष वेधून घेतले, ते वीस वर्षांखालील जागतिक स्पर्धेत चारशे मीटर धावण्याची शर्यत जिंकून. ही ऐतिहासिक कामगिरी केल्यानंतर तिने आशियाई क्रीडा स्पर्धेत देशास रिले शर्यतीचे सुवर्णपदक जिंकून देताना दाखविलेला वेग व आत्मविश्वास असामान्य आहे. घरापासून दीडशे किलोमीटर अंतरावर असलेल्या अकादमीत ती सराव करते. आईवडील शेतावर काम करतात. त्यांना राष्ट्रकुल किंवा आशियाई स्पर्धा म्हणजे काय हे देखील माहीत नाही. अशी पाश्र्वभूमी असलेली हिमा ही भारताची भावी सुवर्णकन्याच आहे. शंभर व दोनशे मीटर अंतराच्या शर्यतीत रुपेरी कामगिरी करणाऱ्या द्युती चंदला अनेक महिने प्रतिकूल स्थितीत तोंड द्यावे लागले आहे. आशियाई स्पर्धा सुरू होण्यापूर्वी तेजिंदरपालसिंग याचे वडील कर्करोगाने खूप आजारी होते. तशा परिस्थितीत गोळाफेकीत स्पर्धाविक्रमासह त्याने सुवर्णपदक जिंकले. आठशे मीटर शर्यतीत विजेतेपद मिळविणारा मनजितसिंग याला या स्पर्धेपूर्वी खराब कामगिरी म्हणून तो नोकरी करीत असलेल्या पेट्रोलियम कंपनीने काढून टाकले होते. मात्र त्या दु:खाचा लवलेश न दाखविता त्याने सोनेरी मोहोर नोंदविली. आशियाई क्रीडा स्पर्धेत चीन, जपान, दक्षिण कोरिया, इराण आदी प्रबळ संघांचे आव्हान असल्यामुळे या स्पर्धा ऑलिम्पिकची रंगीत तालीम मानली जाते. या तालमीत भारतीय खेळाडूंनी बरीच बाजी मारली असल्याने टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला अ‍ॅथलेटिक्समध्ये चांगले यश मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

milind.dhamdhere@expressindia.com