१६ जणांचा समावेश असलेल्या भारताच्या ज्युदो संघाने किर्गिझस्तान येथे होणाऱ्या आशिया-ओशियाना ऑलिम्पिक पात्रता फेरीतून माघार घेतली आहे. स्पर्धेला सुरुवात होण्याआधीच भारतीय संघातील दोन खेळाडूंना करोनाची लागण झाली आहे.

किर्गिझस्तानमध्ये दाखल झाल्यानंतरच भारतीय संघातील अजय यादव (७३ किलो) आणि रितू (५२ किलो) या दोन खेळाडूंचा करोना चाचणी अहवाल सकारात्मक आला आहे. ‘‘५ एप्रिलला अधिकृत वजन चाचणी होण्याआधीच संघातील दोन खेळाडू करोनाग्रस्त आढळून आले. त्यामुळे आंतरराष्ट्रीय ज्युदो महासंघाच्या नियमानुसार संपूर्ण संघाला स्पर्धेतून माघार घ्यावी लागली,’’ असे भारतीय ज्युदो महासंघाच्या (जेएफआय) एका पदाधिकाऱ्याने सांगितले.

भारतीय संघात १२ ज्युदोपटू आणि चार प्रशिक्षकांचा समावेश होता. या संघातील सुशिला देवी (४८ किलो), जसलीन सिंह सैनी (६६ किलो), तुलिका मान (७८ किलो) आणि अवतार सिंग (१०० किलो) या अव्वल खेळाडूंना ऑलिम्पिकचे स्थान मिळवण्याची आशा होती. ‘‘आता भारताचा संपूर्ण संघाला बिशकेक येथे १४ दिवसांसाठी विलगीकरणात राहावे लागणार आहे,’’ असेही त्यांनी सांगितले. या संपूर्ण प्रकाराला भारतीय ज्युदो महासंघ जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी केला.

ते म्हणाले की, ‘‘संपूर्ण संघ चार प्रशिक्षकांसह बिशकेकला रवाना झाला, हे टाळायला हवे होते. संपूर्ण संघ एकत्र प्रवास करत असताना एखादा खेळाडू जरी करोनाबाधित आढळला तर अन्य खेळाडूंच्या ऑलिम्पिक पात्रतेला धक्का बसणार होता. नेमके तेच घडले.’’