आशियाई खेळ सुरु होण्याआधी भारतीय हॉकी संघासाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय हॉकी संघाने जागतिक क्रमवारीत आपलं स्थान सुधारलं आहे. सहाव्या स्थानावरुन भारतीय पुरुष हॉकी संघ पाचव्या स्थानावर आला आहे. नेदरलँड येथे नुकत्याच पार पडलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेत भारताला उप-विजेतेपद मिळालं होतं. अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाने भारतावर पेनल्टी शूटआऊटवर मात केली होती. या कामगिरीचा भारताचं जागतिक क्रमवारीतलं स्थान सुधारण्यासाठी हातभार लागला असल्याचं आंतरराष्ट्रीय हॉकी परिषदेने म्हटलं आहे.

१९०६ गुणांसह ऑस्ट्रेलिया जागतिक क्रमवारीत आपलं पहिलं स्थान टिकवून आहे, तर अर्जेंटिना दुसऱ्या स्थानावर १८८३ गुणांनिशी आहे. याव्यतिरीक्त बेल्जियम तिसऱ्या स्थानावर तर नेदरलँडचा संघ चौथ्या स्थानावर आहे. भारताने १४८४ गुणांची कमाई करत जर्मनीला मागे टाकत सर्वोत्तम ५ संघांमध्ये आपलं स्थान मिळवलं आहे. जर्मनीच्या खात्यात सध्या १४५६ गुण जमा आहेत. नेदरलँडमध्ये मिळवलेलं रौप्यपदक हे भारतीय संघाचं चॅम्पियन्स ट्रॉफीमधलं सलग दुसरं रौप्यपदक ठरलं आहे.