सुरक्षेच्या कारणास्तव भारत-पाकिस्तान लढतीच्या ठिकाणात बदल

भारत आणि पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पध्र्यामध्ये १९ फेब्रुवारी रोजी होणारा ट्वेन्टी-२० विश्वचषकातील सामना धरमशालाऐवजी कोलकाता येथे होणार आहे. सुरक्षा व्यवस्थेच्या मुद्दय़ावरून हा निर्णय घेण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) घोषणेमुळे ही लढत कुठे होणार याविषयीच्या उलटसुलट चर्चाना पूर्णविराम मिळाला आहे.

बहुचर्चित अशी ही लढत हिमालयाच्या कुशीत वसलेल्या निसर्गरम्य धरमशाला येथे आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र सामन्यासाठी जेमतेम आठवडाभराचा कालावधी असताना हिमाचल प्रदेशातील काँग्रेसप्रणित सरकारने सुरक्षा पुरवणे शक्य होणार नसल्याचे स्पष्ट केले. यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डातर्फे दोनसदस्यीय सुरक्षा पथकाने धरमशाला स्टेडियम तसेच परिसराची पाहणी केली. या शिष्टमंडळाने दिलेल्या अहवालानंतर पीसीबीने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला ही लढत अन्यत्र आयोजित करण्याची विनंती केली. या विनंतीला मान देत आयसीसीने ही लढत धरमशालाऐवजी कोलकाता येथे होणार असल्याची घोषणा केली.

‘सुरक्षेच्या कारणांसाठीच ही लढत ठरलेल्या दिवशी अर्थात १९ फेब्रुवारीला संध्याकाळी ७.०० वाजता इडन गार्डन्स, कोलकाता येथे होईल. सुरक्षेच्या संदर्भात हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यामुळे या प्रकरणाला नवे वळण मिळाले. पाकिस्तानविरुद्धच्या लढतीला विरोध करणाऱ्यांना सुरक्षा व्यवस्था पुरवण्यावर त्यांनी साशंकता व्यक्त केली होती. सामना तसेच खेळाडूंचे आगमन निर्गमन तसेच निवासव्यवस्था यादरम्यान सर्वोच्च सुरक्षा व्यवस्था तैनात असणे अपेक्षित आहे. त्याबाबत तडजोड होण्याचा प्रश्नच नाही. धरमशाला येथील लढत रद्द झाल्याने चाहते तसेच संयोजकांची निराशा होणे साहजिक आहे, परंतु आयसीसीच्या स्पर्धामध्ये सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य आहे. सुरक्षा सल्लागारांशी तसेच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे,’ असे आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्ह रिचर्डसन यांनी सांगितले.

या प्रकरणामुळे बीसीसीआय किंवा हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनला दंड किंवा तत्सम शिक्षा होणार का, असे विचारले असता रिचर्डसन म्हणाले, ‘भारत मोठा देश आहे. आंतरराष्ट्रीय सामन्याचे नियोजन करणे अवघड प्रक्रिया आहे. कोलकाता सामना हलवण्याचा निर्णय योग्यच आहे. सुरक्षेच्या संदर्भात अनाठायी शंका उपस्थित करण्यात आल्या. हा निर्णय घेणे कठीण होते. पूर्वनियोजत कार्यक्रमानुसार लढत होणे अपेक्षित होते, मात्र नाइलाजाने आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला. भारतातील सुरक्षा यंत्रणेवर आमचा विश्वास आहे. सर्व सामन्यांना कडेकोट सुरक्षा व्यवस्था असेल. महिलांचे सामने आयोजित करण्याची जबाबदारीही संयोजकांवर आहे. एकूण ५९ सामन्यांच्या आयोजनाची जबाबदारी आहे. हिमाचल प्रदेश संघटनेवर कारवाई होणार का हे आता सांगता येणार नाही.’