भारताचा आशियाई बॉक्सिंग स्पर्धेतील सहभाग अनिश्चित

नवी दिल्ली : नवी दिल्लीत होणारी आशियाई बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धा करोनामुळे दुबईत खेळवण्याचा निर्णय घेतला. पण सहआयोजक असलेल्या भारतीय खेळाडूंनाच व्हिसाची प्रतीक्षा लागून राहिली आहे. त्यामुळे भारतीय खेळाडूंच्या या स्पर्धेतील सहभागावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

आशियाई बॉक्सिंग स्पर्धा २१ मेपासून सुरू होत असून त्यात भारताचे २० बॉक्सर सहभागी होणार आहेत. ‘‘भारतीय पुरुष आणि महिला खेळाडूंना अद्यापही दुबईसाठी व्हिसा मिळालेला नाही. त्यामुळे संघ पाठवण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. सहआयोजक या नात्याने आमचे अधिकारी या स्पर्धेसाठी जाणार होते, पण करोनामुळे परिस्थिती गंभीर बनल्याने आम्ही तूर्तास त्यांना न पाठवण्याचा निर्णय घेतला आहे,’’ असे भारतीय बॉक्सिंग महासंघाचे (बीएफआय) सचिव हेमंता कलिता यांनी सांगितले.

पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार नवी दिल्लीत या स्पर्धेचे आयोजन होणार होते. पण नवी दिल्लीतील आणि देशातील करोनारुग्णांची संख्या वाढू लागल्याने आशियाई बॉक्सिंग महासंघाने ही स्पर्धा दुबईत खेळवण्याचा निर्णय घेतला. या स्पर्धेसाठी पुरुष संघाचे पतियाळा येथील राष्ट्रीय क्रीडा संस्थेत तर महिलांचे पुणे येथील आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिटय़ूट येथे सराव शिबीर सुरू आहे. पण महिलांच्या शिबिरात १० पैकी पाच जणींनीच हजेरी लावली आहे. भारताचे नऊ बॉक्सर आतापर्यंत २३ जुलैपासून रंगणाऱ्या टोक्यो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले आहेत.