२०१८च्या विश्वचषक स्पध्रेसाठीच्या पात्रता फेरीत इराणविरुद्ध होणाऱ्या लढतीसाठी भारतीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षक स्टिफन कॉन्स्टनटाइन यांनी गुरुवारी संभाव्य २८ खेळाडूंच्या नावाची घोषणा केली. फिफाने नुकत्याच जाहीर केलेल्या क्रमवारीत इराणचा संघ ३८व्या स्थानावर विराजमान आहे आणि भारत १५६व्या स्थानावर आहे. त्यामुळे इराणविरुद्ध सर्वोत्तम संघ उतरण्याचा कॉन्स्टनटाइन यांचा प्रयत्न असेल. ८ सप्टेंबरला बंगळुरू येथील श्री कांतीरावा स्टेडियमवर ही लढत होणार आहे.
भारताच्या संभाव्य संघाचे सराव शिबीर २३ ऑगस्टला पुण्यात आयोजित करण्यात आले आहे. इराणविरुद्धच्या लढतीपूर्वी सराव म्हणून भारत ३१ ऑगस्टला नेपाळविरुद्ध मैत्रीपूर्ण लढत खेळणार आहे. जूनमध्ये ओमान आणि ग्वामाविरुद्धच्या लढतीत अंतिम २३ जणांच्या चमूत कॉन्स्टनटाइन यांनी बदल करून हा संभाव्य संघ जाहीर केला आहे. इंडियन सुपर लीगच्या लिलावात समाविष्ट असलेला एकमेव गोलरक्षक करनजीत सिंग याच्यासह अरिंदम भट्टाचार्यला संभाव्य संघात स्थान देण्यात आले आहे. रिगन सिंग, गुरविंदर सिंग आणि ऑगस्टीन फर्नाडिस या बचावपटूंना वगळण्यात आले असून त्यांच्याजागी आयबोरलँग खोंगजी, नारायण दास आणि प्रीतम कोटल यांना संधी मिळाली आहे. मध्यरक्षकांमध्ये मंदार राव देसाई याला स्थान मिळालेले नाही.
भारताचा संभाव्य संघ
गोलरक्षक : सुब्राता पॉल, करनजीत सिंग, गुरप्रीत सिंग संधू, अरिंदम भट्टाचार्य, सांजीबान घोष
बचावपटू : अर्नब मोंडल, संदेश झिंगन, आयबोरलँग खोंगजी, धनचंद्र सिंग, लालछुआंमाविआ, नारायण दास, रिनो अँटो, प्रीतम कोटल
मध्यरक्षक : धनपाल गणेश, एग्युएसन लिंगडोह, कॅव्हीन लोबो, सेहनाज सिंग, जॅकिचंद सिंग, प्रणॉय हल्डर, ब्रँडन फर्नाडिस, फ्रांसिस फर्नाडिस, सी. के. विनिथ, रॉवलीन बोर्गेस, रोमिओ फर्नाडिस
आघाडीपटू : होलीचरण नारजरी, जेजे लाल्पेखलुआ, रॉबिन सिंग, सुनील छेत्री.